केंद्र स्तरीय बाल क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सव भव्यदिमाखात संपन्न –
गर्देवाडा: संपूर्ण परिसरातील विद्यार्थ्यांची उत्सुकता, पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचा उत्साह आणि गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग यामुळे केंद्र स्तरीय बाल क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गर्देवाडा येथे अत्यंत भव्य, अनुशासित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मुलांनी क्रीडा प्रात्यक्षिके, सांस्कृतिक नृत्य-गीत, कला उपक्रम, पारंपरिक खेळ यामध्ये अपूर्व प्रतिभा सादर केली. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला अनोखी दिशा दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. शिलाताई गोटा, माजी पंचायत समिती सदस्य यांच्या शुभहस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाढत चाललेली क्रीडा-संस्कृतीची जडणघडण कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी जीवनात क्रीडेबरोबरच संस्कृतीची सांगड घालून पुढे जाण्याचा संदेश दिला.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तेजन देत, कला आणि संस्कृती ही गावची खरी ताकद असल्याचे मत व्यक्त केले.
मुख्य आकर्षण ठरलेल्या बक्षीस वितरण समारंभात मा. सैनुजी गोटा, संचालक – आदिवासी विविध सहकारी महामंडळ, नाशिक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच श्री. गोविंद शाह, अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती व श्री.सुरज जक्कुलवार सामाजिक कार्यकर्ता श्री.रमेश कवडो प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते देखील पुरस्कार देण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व केंद्र प्रमुख श्री. एम.सी. बेडके यांनी अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध पद्धतीने केले. स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थ्यांचा सहभाग, मैदानाची तयारी, परीक्षकांचे नियोजन, सुविधांची उपलब्धता या सर्व बाबींवर त्यांनी काटेकोर लक्ष दिले.
कार्यक्रमाचे संचालन प्रभावीपणे श्री. सी. डी. लांजेवार यांनी केले. तर संपूर्ण आयोजनाची धुरा श्री. पंतनीत सातपुते यांनी समर्थपणे पेलली. गर्देवाडा गावातील नागरिक, पालक, माजी विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनीही कार्यक्रमाला दिलेले सहकार्य उल्लेखनीय ठरले.
दिवसभर चाललेल्या धावणे, खो-खो, कबड्डी, लांब उडी, बॉलथ्रो, विविध कला-स्पर्धा, समूह नृत्य, गायन, भाषण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम अशा असंख्य स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अमिट छाप सोडली. उत्कृष्ट शिस्त, समन्वय आणि कलाकुसरीच्या बळावर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गट्टा ने चॅम्पियनशिप मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आणि संपूर्ण केंद्राचा अभिमान वाढवला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक, पालक, आयोजक मंडळ, गावकऱ्यांचे आभार मानत उपक्रम संपन्न झाला. हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक क्षितिजाचा दिशादर्शक ठरला, अशी सर्वांची भावना व्यक्त झाली.





