गडचिरोलीत पक्षांतरांची मालिका सुरुच ; महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर राष्ट्रवादीत
गडचिरोली दि.30:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना जिल्ह्यातील पक्षांतरांची मालिका जोरात सुरुच आहे. काँग्रेस व भाजपमधील सलग पक्षप्रवेशानंतर आज पुन्हा एक मोठा धक्का बसला असून महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड. कविता मोहरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करत राजकीय समीकरणे ढवळून काढली. माजी मंत्री व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांना पक्षाचा दुपट्टा परिधान करुन स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर प्रचारसभा प्रभाग क्र. 11 मध्ये आमदार आत्राम यांच्या उपस्थितीत पार पडली. याच सभेत मोहरकर यांच्यासह काही महिला-पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत विश्वास व्यक्त केला.
पक्षत्यागाचे कारण स्पष्ट करताना मोहरकर म्हणाल्या, “काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मला सातत्याने डावलले जात होते. नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाही, पण महिला
जिल्हाध्यक्ष असूनही कुठल्याही कार्यक्रमात मला बोलावले जात नव्हते. प्रोटोकॉल पाळला जात नव्हता. नगरसेवक उमेदवारीतही महिला कार्यकर्त्यांना संधी न देता बाहेरच्या व्यक्तींवर भर दिला गेला. मला आजही काँग्रेसच्या वरिष्ठांबद्दल आदर आहे, पण जातीपातीचे राजकारण वाढत असल्याचे पाहून वेदना झाल्या.”
या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, रविंद्र ओल्लालवार, लिलाधर भरडकर, श्रीनिवास गोडसेलवार यांच्यासह निवडणूक रिंगणातील उमेदवार उपस्थित होते.
जिल्ह्यातील राजकारण तापलेले असताना पदाधिकाऱ्यांच्या ‘इकडून तिकडे उड्या’मुळे निवडणूक रिंगणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.




