*जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला*

42

*जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला*

 

गडचिरोली दि. 5 : जागतिक स्तरावर ५ डिसेंबर रोजी साजरा होणारा ‘जागतिक मृदा दिन’ गडचिरोली जिल्ह्याच्या बामणी येथे मोठ्या उत्साहात व महत्त्वपूर्ण माहितीच्या आदानप्रदानाने साजरा करण्यात आला. निरोगी मातीचे महत्त्व आणि तिचे संवर्धन यावर या कार्यक्रमात प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

 

बामणी येथील कृषी विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला कृषी क्षेत्रातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी गावातील सरपंच श्रीमती अर्चना नंदेश्वर, कृषी उपसंचालक तथा मृद चाचणी प्रयोगशाळेच्या नोडल अधिकारी श्रीमती मधुगंधा जुलमे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्री. तुमसरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती सुप्रिया कळंबरकर आणि तंत्र अधिकारी श्री. चौधरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी श्रीमती सुप्रिया कळंबरकर यांनी केली. त्यांनी उपस्थितांना जागतिक मृदा दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. उप कृषी अधिकारी श्री बुध्दे यांनी मृदा नमुना कसा काढावा, याचे प्रात्यक्षिक व्हिडिओच्या माध्यमातून सादर केले, जेणेकरून शेतकऱ्यांना अचूक नमुना काढता येईल. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती मधुगंधा जुलमे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. रसायनिक खतांचा वाढत चाललेला वापर आणि त्यामुळे मातीवर होणारे दुष्परिणाम तसेच सेंद्रिय खते, अंतर पीक पध्दतीचा अवलंब करून, माती परीक्षण करून, शेतात मित्र कीटक आणि गांडूळे वाढतील असे वातावरण तयार करणे, ‘माती’चे महत्त्व ओळखून आणि तिच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी प्रत्यन करण्या बाबत मार्गदर्शन केले.

मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्री. तुमसरे यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले प्रतिनिधिक मृदा नमुना कसा काढावा, याबद्दल तांत्रिक आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. तंत्र अधिकारी श्री. चौधरी यांनी आपल्या खास शैलीत मातीचे महत्त्व एका सुंदर कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या समस्या, अनुभव आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली. अशा प्रकारे बामणी येथे ‘जागतिक मृदा दिन’ साजरा करण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या जमिनीच्या आरोग्याबद्दल आणि तिच्या संवर्धनाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली. तसेच, मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आणि कृषी विभागाच्या महाविस्तार ॲप बाबतही माहिती देण्यात आली आणि कृषी विषयक अद्ययावत माहिती व योजनांसाठी सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे.