*धर्म विभाजनासाठी नसून जोडण्यासाठी असले पाहिजे* — अनुप कोहळे यांचे प्रतिपादन
अनंतपुर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी
गडचिरोली :: महाराष्ट्रात संत-महात्म्यांची ज्ञान, भक्ती आणि समता यांची संपन्न परंपरा आजही समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहे. विज्ञानवादी विचार, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा व मानवतेचा संदेश देणाऱ्या संतांनी समाजाला योग्य दिशा दिली. “धर्म हा माणसाला विभाजन करणारा नसून, माणसामाणसातील प्रेम, बांधिलकी आणि बंधुता वाढविणारा असावा”, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील अनंतपुर येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. गावात पारंपरिक उत्साहात भजन, दिंडी, पालखीचा सोहळा काढण्यात आला. नंतर आयोजित मुख्य सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोहळे म्हणाले की, संतांनी दिलेला समानतेचा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. समाजात जात, धर्म, भाषा या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असताना संतविचारच समाजाला एकत्र ठेवू शकतो.
पुढे ते म्हणाले की, पर्यावरण संवर्धन, मुलांचे संस्कार, शिक्षणातील परिवर्तन, मद्यविकारमुक्त समाज आणि ग्रामीण विकास ही वेळेची गरज आहे. आजच्या तरुणांनी संतांचे आदर्श ध्येय म्हणून स्वीकारले, तर गावागावांत सकारात्मक बदल दिसून येईल.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपसरपंच काशिनाथ बुरांडे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून श्री गिरमाजी दुधबावरे, श्री विनोद पांडे (व्यसनमुक्ती समुपदेशक), श्री दिवाकर बरसागडे (निमडर टोला), हरीदास वासेकर, श्री गुरुदास गलाई, श्री रोषण बरसागडे, बाळाभाऊ दुधबावरे, सौ. रजुताई बोदलकर (अंगणवाडी सेविका), श्री सोमाजी दुधबावरे, श्री गुलाबसिंग धोती सर, श्री राजु नरताम, श्री दशरथ कुनघाडकर, श्री संतोष नरताम, श्री सुनिल बुरांडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सरिता नैताम यांनी केले.




