गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे निवेदन
गडचिरोली |
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेतील गंभीर प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी ठाम मागणी केली.
डॉ. होळी यांनी निवेदनातून स्पष्ट केले की, शिक्षकांच्या अभावामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरून नियमित व गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था निर्माण करणे अत्यावश्यक आहे.
तसेच जिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी अशा शाळांच्या इमारतींची तातडीने डागडुगी करून नविनिकरण करावे व आवश्यक त्या ठिकाणी नवीन शाळा इमारतींच्या बांधकामास मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेऊन संबंधित विभागाकडून प्रस्ताव मागवून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याचे यावेळी दिसून आले.







