*पोटाची खडकी भरण्यासाठी जीवावर बेतून करावी लागते मजुरी :*

93

*पोटाची खडकी भरण्यासाठी जीवावर बेतून करावी लागते मजुरी :*

 

*तेलंगणात धान रोवणीसाठी जाणाऱ्या गावकऱ्यांची वेदनादायी वास्तवकथा**

 

शेती हेच जीवन… आणि शेतीवरच उदरनिर्वाह.पण शेती संपली की पोटाचा प्रश्न उभा ठाकतो—हा प्रश्न आज महाराष्ट्रातील असंख्य ग्रामीण कुटुंबांचा जखमेवर मीठ चोळणारा वास्तव आहे.

 

धान पिकांची रोवणी, कापणी, शेतीतील इतर हंगामी कामं आटोपली की गावकऱ्यांच्या घरात शांतता राहत नाही, तर चिंता पसरते.“आता पुढचे दोन–चार महिने काय करायचं?”,

“घर चालवायचं कसं?”,“मुलांच्या पोटात भाकरी टाकायची कशी?”

असे प्रश्न प्रत्येक घरात घुमू लागतात. गावात काम नाही, मजुरी मिळत नाही, आणि जे काम मिळतं त्याची मजुरी इतकी तुटपुंजी की त्यात दिवस काढणंही अवघड.

 

याच विवंचनेतून दरवर्षी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आपले ढिवर (भोई),माळी,तेली,कुणबी,आदिवासी,व इतरही समाज बांधव शेकडो कुटुंबं, संसार पाठीवर बांधून तेलंगणा राज्याची वाट धरतात. हा प्रवास स्वेच्छेने नसतो, तर उपासमारीच्या भीतीने भाग पाडलेला असतो.

 

घरातली लहान लहान मुलं, वृद्ध आई-वडील, आजारी माणसं गावात सोडून हे मजूर तेलंगणातील परराज्यात निघतात. कुणी नवऱ्यासोबत बायको, तर कुणी संपूर्ण कुटुंब घेऊन जातं. डोक्यावर पिशव्या, हातात भांडी, अंगावर फाटकी कपड्यांची गाठ—हा प्रवास कुठल्याही सुखासाठी नाही, तर केवळ पोटाची खडकी भरण्यासाठी.

 

तेलंगणात पोहोचल्यावर सुरू होतं खरं कष्टाचं आयुष्य. पहाटे अंधारात उठून चिखलात उभं राहून धान रोवणीचं काम. पायाच्या पोटरी पर्यंत चिखल, तासन्‌तास वाकून काम. उन्हाची तिखट झळ, पावसाची सर, अंगात ताप असला तरी काम थांबत नाही—कारण काम थांबलं, तर मजुरी थांबते.मजुरी कमी असते, पण दुसरा पर्याय नसतो.“काय करणार? पोटासाठी करावंच लागतं,”

हेच उत्तर प्रत्येक मजुराच्या तोंडी असतं. कष्ट करताना चेहऱ्यावर कधीकधी हसू दिसतं, पण त्या हसण्यामागे असतो उपासमारीचा, असुरक्षिततेचा आणि भीतीचा मोठा डोंगर.

 

या मजुरीच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था म्हणजे अक्षरशःअशी तशीच शेताच्या कडेला, ताडपत्रीखाली किंवा घराच्या विसाव्याखाली मुक्काम. ना भक्कम निवारा, ना स्वच्छ पाणी, ना शौचालयाची सोय. पाणी पण कुठलंही मिळेल तेच प्यायचं—शुद्ध आहे की नाही, कुणी विचारत नाही, विचारायची ऐपतही नसते.

 

याच अस्वच्छ पाण्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या, ताप, संसर्गजन्य आजार होतात. आजार बळावला तरी उपचार मिळतीलच याची खात्री नसते. दवाखाना लांब, पैसे नाहीत, भाषा समजत नाही—मग आजार अंगावर काढून काम सुरूच राहतं. अनेक वेळा याच निष्काळजीपणामुळे परिस्थिती जीवघेणी बनते.

 

त्यातच मोकळ्या शेतात राहणं म्हणजे साप, विंचू, कीटक यांचा सततचा धोका. रात्री झोपेत सर्पदंश होण्याच्या घटना घडतात. गेल्या काही वर्षांत तेलंगणात काम करत असताना आपल्या भागातील अनेक मजुरांचा सर्पदंशाने, तीव्र तापाने किंवा पोटाच्या गंभीर विकारांमुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तरीही या मृत्यूंची कुठे नोंद नाही, कुठे जबाबदारी नाही.

 

हे सगळं माहीत असूनही मजूर पुन्हा पुन्हा जातात. कारण त्यांच्या दृष्टीने उपासमारीचा धोका हा सर्पदंशापेक्षा मोठा असतो.“मेलो तरी चालेल, पण पोरं उपाशी राहू नयेत,”

हीच त्यांची मनोवेदना.

 

मात्र इथेच समाजाने, आणि विशेषतः आपल्या मजुरांनीही थोडं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. हे कटू असलं, तरी सत्य आहे—आपल्याकडील काही मजूर केवळ कष्टासाठीच नव्हे, तर शोकपाणी, नशापाणी आणि व्यसनांच्या आहारी जाण्यासाठीही तेलंगणात जातात. तिथे मिळणाऱ्या मजुरीसोबत दारू, तंबाखू, गुटखा, इतर व्यसनांची सवय अधिक घट्ट होते.

 

दिवसभर अंग मोडून काम, रात्री नशा—यात ना शरीराची काळजी, ना जेवणाची शिस्त, ना आरोग्याची तमा. आजार अंगावर काढले जातात, थकवा दुर्लक्षित केला जातो. आणि दुर्दैवाने, तेलंगणातून कमावलेली मजुरी घेऊन गावात परत आल्यानंतरही ही सवय तिथेच थांबत नाही. गावात आल्यावरही पुन्हा दारू, व्यसन, निष्काळजी जीवनशैली सुरूच राहते.

 

अशा परिस्थितीत शरीरावर श्रमाचा ताण आणि व्यसनांचा मार—या दोन्हींचा एकत्रित परिणाम कधी, कुठे, कसा जीवघेणा ठरेल, हे सांगता येत नाही. अचानक मृत्यू, गंभीर आजार, कुटुंब उद्ध्वस्त होणं—ही साखळी इथेच सुरू होते.

 

म्हणूनच हा प्रश्न फक्त रोजगाराचा नाही, तर जागरूकतेचा, आरोग्याचा आणि जबाबदारीचाही आहे.यासाठी स्थानिक रोजगार, आरोग्य सुविधा, स्थलांतरित मजुरांची सुरक्षा यासाठी ठोस पावलं उचललीच पाहिजेत; पण त्याचबरोबर मजुरांनीही आपल्या शरीराची, कुटुंबाची आणि भविष्यातील आयुष्याची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे.

 

ही कहाणी एखाद्या एका गावाची नाही, तर संपूर्ण परिसरातील शेकडो कुटुंबांची वास्तवकथा आहे. रोजगाराच्या शोधात परराज्यात जाऊन जीव धोक्यात घालून काम करावं लागणं, आणि त्याच वेळी व्यसनांमुळे स्वतःचं आयुष्य आणखी धोक्यात घालणं—ही आपल्या समाजव्यवस्थेची दुहेरी शोकांतिका आहे.

 

तोपर्यंत मात्र, पोटाच्या खडकीसाठी घरदार सोडून तेलंगणाची वाट धरणारा हा मजूर, आपल्या रक्त-घामाने इतरांची शेती हिरवीगार करत असतानाच, स्वतःचं आयुष्य रोज मरणाच्या सावलीत घालवत आहे—हीच आपल्या समाजव्यवस्थेची वेदनादायी शोकांतिका आहे.

लेखनकर्ते :

*दिवाकर रामदास गेडाम*

माजी खासदार मान. डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख तसेच ग्रामपंचायत सदस्य – व्याहाड बुज

.