अहेरी एसबीआय बँकेचा भोंगळ कारभार; स्थायी मॅनेजरअभावी ग्राहक वाऱ्यावर!
४ जानेवारीपर्यंत नियुक्ती न झाल्यास बँकेला कुलूप ठोकण्याचा संतोष ताटीकोंडावार यांचा इशारा
अहेरी (तालुका प्रतिनिधी):
तालुका मुख्यालयी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून, गेल्या जुलै महिन्यापासून येथे स्थायी मॅनेजर नसल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भोंगळ कारभारामुळे शेतकरी, व्यापारी आणि नोकरदारांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.
आर्थिक व्यवहार ठप्प, नागरिकांचे हाल
अहेरी येथील या राष्ट्रीयकृत बँकेत केवळ शहरांतीलच नव्हे, तर तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो ग्राहकांची खाती आहेत. दररोज येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, कायमस्वरूपी व्यवस्थापक नसल्याने कर्ज प्रकरणे, शासकीय आणि निमशासकीय कामांच्या फाईल्स धूळ खात पडल्या आहेत.
दूरवरून येणाऱ्या गावखेड्यातील नागरिकांना साध्या कामासाठीही बँकेचे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात असून, तासनतास ताटकळत राहिल्यानंतरही काम न होताच खाली हाताने परत जाण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
जुलै महिन्यापासून ही समस्या कायम असतानाही बँक प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावरून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या उदासीनतेमुळे अहेरी उपविभागातील चारही तालुक्यातील ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांवर विपरीत परिणाम झाला आहे.
> “अहेरी येथील एसबीआय शाखा ही केवळ तालुक्यासाठीच नव्हे, तर उपविभागातील चार तालुक्यांसाठी महत्त्वाची आहे. मात्र, जुलैपासून मॅनेजर नसल्याने सामान्य जनता भरडली जात आहे. प्रशासनाने ४ जानेवारीपर्यंत येथे स्थायी मॅनेजरची नियुक्ती करून कामकाज सुरळीत न केल्यास, जनतेला सोबत घेऊन बँकेला कुलूप ठोकण्यात येईल.”
> — संतोष ताटीकोंडावार (सामाजिक कार्यकर्ते)





