पत्नी व प्रियकराने मिळून केला पतीचा खून,दोघे अटकेत, कुरखेडा शहर हादरले

172

पत्नी व प्रियकराने मिळून केला पतीचा खून,दोघे अटकेत, कुरखेडा शहर हादरले

 

कुरखेडा (दि. ३१ डिसेंबर)

नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येलाच कुरखेडा शहरात घडलेल्या एका खळबळजनक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून करून तो अपघात असल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, देवानंद सूर्यभान डोंगरावर (वय ३३ रा. गेवर्धा) याचा काही वर्षांपूर्वी रेखा (वय २८) हिच्याशी विवाह झाला होता. दोघे कुरखेडा शहरातील प्रताप वॉर्ड येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. विवाहानंतर पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असल्याची माहिती असून, दरम्यान रेखा हिचे विश्वा सांगोळे (वय २५, रा. भरनुली) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

 

३० डिसेंबर रोजी रात्री घरातच पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. या वादातूनच पत्नी रेखा हिने प्रियकर विश्वा याच्या मदतीने धारदार शस्त्राने पती देवानंद याची निर्घृण हत्या केली. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दुचाकीवरून सती नदी पुलाजवळ नेऊन टाकला. त्याच ठिकाणी दुचाकी पाडून अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आला.

 

मात्र, मृतदेह नेण्यात आलेल्या मार्गावर आढळलेले रक्ताचे डाग, घटनास्थळी मिळालेले पुरावे व संशयास्पद परिस्थितीमुळे पोलिसांचा संशय बळावला. शवविच्छेदन अहवालात मृत्यू हा अपघाती नसून पूर्वनियोजित हत्येमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग उघडकीस आणला.

 

यानंतर कुरखेडा पोलिसांनी प्रताप वॉर्ड येथे जाऊन आरोपी पत्नी रेखा व तिचा प्रियकर विश्वा यांना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

या धक्कादायक हत्याकांडामुळे नववर्षाच्या आनंदाऐवजी कुरखेडा शहरात भीती, संताप आणि चर्चेचे वातावरण पसरले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.