*रस्ते अपघात शून्यावर आणण्याचा संकल्प; वेग, मद्यपान व निष्काळजीपणावर कठोर नियंत्रण गरजेचे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

16

*रस्ते अपघात शून्यावर आणण्याचा संकल्प; वेग, मद्यपान व निष्काळजीपणावर कठोर नियंत्रण गरजेचे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. ३१ :

“रस्ते अपघातांमध्ये एकाही व्यक्तीचा जीव जाऊ नये, हेच प्रशासनाचे अंतिम ध्येय आहे. वेगमर्यादा, सिग्नल नियम, सीट बेल्ट–हेल्मेटचा वापर, मद्यपान करून वाहन चालविण्यावर कठोर कारवाई, तसेच ब्लॅक स्पॉटवर तातडीच्या उपाययोजना केल्यास अपघातांची संख्या कमी करून शुन्यावर आणता येईल,” अशा सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.

 

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली मार्फत ‘रस्ता सुरक्षा अभियान–२०२६’ अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजन भवन येथे दीपप्रज्वलन करून त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनिष मेश्राम, विभागीय वाहतूक नियंत्रक अशोक कुमार वाडीभस्मे, राष्ट्रीय महामार्गांचे कनिष्ठ अभियंता सिद्धांत पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते

जानेवारी १ ते ३१, २०२६ या कालावधीत राबविण्यात येणारे हे अभियान प्रत्यक्षात वर्षभर चालणारी सामाजिक चळवळ ठरली पाहिजे, असे सांगत जिल्हाधिकारी पंडा यांनी वाढती वाहतूक, औद्योगिकीकरणामुळे वाढलेली रहदारी आणि त्यामुळे वाढलेली जबाबदारी अधोरेखित केली. रस्त्यांवरील वळणांवरील झुडपे–झाडे हटविणे, खड्डे बुजविणे, ब्लॅक स्पॉटची निवड करून सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओने समन्वयाने उपाययोजना करणे, पादचाऱ्यांना प्राधान्य देणे, चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा सक्तीने वापर करणे, सिग्नल नियमांचे काटेकोर पालन करणे, तसेच अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमीला तातडीने रुग्णालयात पोहोचविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. १०८ व ११२ या टोल-फ्री क्रमांकांचा तात्काळ वापर करून जीव वाचविता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी विद्यार्थी हे जिल्ह्याचे ‘ब्रँड अँबेसडर’ असल्याचे सांगत नियमांनुसार लर्निंग लायसन्स काढणे, दलालांपासून दूर राहणे, पूर्ण प्रशिक्षणानंतरच वाहन चालविणे, मद्यपान व अतिवेग टाळणे, तसेच अपघातग्रस्तांना मदत करण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन केले. अपघातस्थळी मदत करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, उलट ‘गोल्डन अवर’मध्ये मदत मिळाल्यास जीव वाचू शकतो, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी सांगितले. प्रभारी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सिग्नलवर संयम पाळणे, हेल्मेटचा वापर आणि इतरांच्या जीवाचा आदर ठेवण्याचे आवाहन केले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी भारत व महाराष्ट्रात रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज मांडली. रिफ्लेक्टिव्ह टेप, ड्रंक अँड ड्राइव्हविरोधी कारवाई, योग्य साईनबोर्ड, वेगमर्यादा, सीट बेल्ट–हेल्मेट, मोबाईल वापरावर निर्बंध यांची अंमलबजावणी, तसेच शाळा–महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून सामाजिक चळवळ उभी करता येईल, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

 

विभागीय वाहतूक नियंत्रक अशोक कुमार वाडीभस्मे यांनी वेगमर्यादा व ध्वनीमर्यादेचे पालन, पादचाऱ्यांना प्राधान्य आणि ‘मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक’ हा संदेश देत वाहनचालकांतील अहंकार व ओव्हरटेकिंगमुळे होणाऱ्या अपघातांकडे लक्ष वेधले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनिष मेश्राम यांनी वाहनचालकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचे असल्याचे सांगून तणाव, आजारपण, मिरगी, हृदयविकार, कलर ब्लाइंडनेस आदी स्थितीत वाहन चालविण्याचा धोका स्पष्ट केला.

 

कार्यक्रमात रस्ता सुरक्षा अभियान पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच परिवहन विभागातील २५ वर्षे अपघातमुक्त सेवा दिलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते हेल्मेट देऊन गौरव करण्यात आला. रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री हर्षल बदखल यांनी केले. तर

आभार प्रदर्शन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम, यांनी केले.

 

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री अशोक जाधव, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक श्री अविनाश अंभार, मोटार वाहन निरीक्षक श्री नवनाथ जगदाळे, माटार वाहन निरीक्षक श्री अक्षय सालंकी, मोटार वाहन निरीक्षक श्री. गोपाल धुर्वे, मोटार वाहन निरीक्षक श्री कमलेश खाड, मोटार वाहन निरीक्षक श्री भागवत चापड, मोटार वाहन निरीक्षक श्री चतन पाटील, मोटार वाहन निरीक्षक श्री स्वप्नील वानखंड, सहा मोटार वाहन निरीक्षक श्री पवन येवले, सहा मोटार वाहन निरीक्षक श्री थोडीबा ढग, सहा मोटार वाहन निरीक्षक श्रो गारवकुमार सिह, सहा माटार वाहन निरीक्षक श्री देवेंद्र पाटील, सहा मोटार वाहन निरीक्षक अनंत गायकवाड यांनी विशेष मेहनत घतली

यावेळी परिवहन विभाग व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी–कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.