Home Breaking News गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून “ऑपरेशन रोशनी” अंतर्गत मोफत नेत्र...

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून “ऑपरेशन रोशनी” अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

118

 

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून “ऑपरेशन रोशनी” अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

 

* दोन महिन्याच्या कालावधीत एकूण 461 नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

* गडचिरोली पोलीस दल, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, रोटरी क्लब, नागपूर व शालीनीताई मेघे रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम

* शस्त्रक्रिया झालेले सर्व नागरिक आता नवीन व बदलते गडचिरोली आपल्या डोळ्यांनी बघु शकणार आहेत…पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल

 

गडचिरोली पोलीस दल “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून दृष्टीदोष असलेल्या रुग्णांच्या जीवनातील अंधकार दूर करुन त्यांना नवी दृष्टी प्राप्त करुन देण्यासाठी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, रोटरी क्लब साऊथ ईस्ट, नागपूर व शालीनीताई मेघ रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन रोशनी” हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2025 दरम्यान जिल्ह्रातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्तरावर एकूण 11 ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

 

या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तसेच दिनांक 05 जानेवारी 2025 रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या मोबाईल हॉस्पिटल व्हॅनमध्ये नेत्र तपासणी शिबीर पार पडले आहे. यामध्ये 1473 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकूण 461 रुग्णांची दोन टप्यांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली व रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूर यांच्या सहकार्याने शालीनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर येथे माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2025 मध्ये यशस्वीरित्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले आहे की, भविष्यात देखील ऑपरेशन रोशनी उपक्रमाचा लाभ ग्रामीण भागातील इतर नागरिकांनी घ्यावा. तसेच “या यशस्वीरित्या पार पडलेल्या शस्त्रक्रियेमुळे हे सर्व नागरिक आता नवीन व बदलते गडचिरोली आपल्या डोळ्यांनी बघु शकणार आहेत.” असे त्यांनी सांगितले. मोफत उपचार झाल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व रुग्णांनी गडचिरोली पोलीस दलाच्या उपक्रमाचे कौतुक करुन गडचिरोली पोलीस दल, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, रोटरी क्लब नागपूर व शालीनीताई मेघे रुग्णालयाचे आभार मानले.

 

सदर शिबिर हे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, सोबत डॉ. मनिष मेश्राम, प्रभारी अतिरीक्त शल्य चिकीत्सक, श्री. राजीव वरभे चेअरमन- सर्विस प्रोजेक्ट (मेडीकल) रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ-ईस्ट, श्री. अश्विन रडके विशेष कार्यकारी अधिकारी, शालीनीताई मेघे रुग्णालय नागपूर, श्री. राकेश चांदेकर नेत्र चिकित्सा अधिकारी तथा नोडल ऑफीसर, डॉ. सुनिल भड, नेत्र शल्य चिकित्सक, डॉ. सुमित मंथनवार, नेत्र शल्य चिकित्सक, श्री. कृष्णा पिंपळे नेत्र चिकित्सा अधिकारी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तालुका वैद्यकिय अधिकारी व नेत्र चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय टीम, रोटरी क्लब नागपूर टीम, शालीनीताई मेघे रुग्णालय, नागपूर टीम, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Don`t copy text!