221

राज्यस्तरीय विविध क्लब सादरीकरण स्पर्धेत श्री. एम.सी. बेडके यांचे घवघवीत यश

 

गट्टा (ता. 9 जानेवारी 2026) — महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय क्रीडा व शैक्षणिक उपक्रम स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), जालना येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गट्टा येथील शिक्षक श्री. एम.सी. बेडके यांनी राज्यस्तरीय विविध क्लब सादरीकरण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.

 

या स्पर्धेत शाळेत राबविण्यात आलेल्या विविध सहशालेय व क्रीडा आधारित क्लब उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये वीर बिरसा स्पोर्ट्स क्लबचे यशस्वी आयोजन व त्याअंतर्गत राबविण्यात आलेले क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित करणारे उपक्रम प्रभावीपणे सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारे हे उपक्रम नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण स्वरूपात राबविण्यात आल्याचे सादरीकरणातून स्पष्ट झाले.

 

या यशामागे शाळेतील सर्व शिक्षकवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे श्री. बेडके यांनी नमूद केले. त्यांच्या सादरीकरणात नाविन्य, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग व सामाजिक जाणीव यांचा समतोल साधण्यात आला होता. त्यामुळे परीक्षक समितीने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेत कौतुक केले.

 

या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील विविध अधिकाऱ्यांनी श्री. एम.सी. बेडके यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, सहशिक्षक, पालकवर्ग व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Don`t copy text!