Home गडचिरोली अंधारलेल्या वाटेवर ज्ञानाची प्रकाशज्योत,३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह

अंधारलेल्या वाटेवर ज्ञानाची प्रकाशज्योत,३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह

93

अंधारलेल्या वाटेवर ज्ञानाची प्रकाशज्योत,३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह

गडचिरोली, प्रतिनिधी :-

“अंधारलेल्या वाटेवर ज्ञानाची प्रकाशज्योत पेटवूया…” ही संकल्पना बाळगून दृष्टीहीन मुलामुलींना जगण्याचे बळ देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्या कलागुणांना वाव देऊन व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे तसेच समाजात विविध क्षेत्रांत सक्षमपणे वावरण्यासाठी त्यांना तयार करणे, या उदात्त हेतूने राष्ट्रीय दृष्टीहीन संघ व मैत्री परिवार संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे ३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

या शैक्षणिक सप्ताहात राज्यभरातील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून आपले कलागुण सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. त्यांच्या कला, वक्तृत्व आणि सादरीकरणातून आत्मविश्वासाचे दर्शन घडत असून या सप्ताहाच्या निमित्ताने राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील १५ शाळांमधील सुमारे ३५० दृष्टीहीन विद्यार्थी दाखल झाले आहेत.

राष्ट्रीय दृष्टीहीन संघ व मैत्री परिवार शाखा, गडचिरोली यांच्या वतीने स्थानिक अभिनव लॉन येथे ८ ते १२ जानेवारी या कालावधीत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यालय नसतानाही मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष निरंजन वासेकर यांनी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या मदतीला धावून येत या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावून मानवता व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.

या उपक्रमास श्री साई इन्स्टिट्यूट तथा नर्सिंग कॉलेज, वाकडी, लॉयड मेटल्स लिमिटेड तसेच पोलीस विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या शैक्षणिक सप्ताहात पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, हिंगोली तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर यांसह राज्यातील १५ जिल्ह्यांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

दि. ८ जानेवारी रोजी शैक्षणिक सप्ताहाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे राज्याध्यक्ष रघुनाथ बारड होते. स्वागताध्यक्ष म्हणून मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष निरंजन वासेकर उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ व मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!