_*मौजा फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता; खरेदी केंद्राचे भोंगळ कारभार उघड*_
_आमदार रामदास मसराम यांची प्रत्यक्ष पाहणी_
मौजा.फरी, ता. देसाईगंज येथील आरमोरी सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती मर्या. आरमोरी (रजि. नं. ६३०) या धान खरेदी केंद्रावर आज दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी धान खरेदीत काटा (वजन) न करता प्रती कट्टा ४० किलो ५०० ग्रॅमप्रमाणे धान घेतले जात असल्याची तसेच प्रत्येकी ५०० ग्रॅमची ‘देणगी’ घेतली जात असल्याची तक्रार केली.
खरेदी प्रक्रिया टोकन नंबरनुसार न होता अनेक शेतकऱ्यांचे नोंदणीविना धान खरेदी झाल्याचे आढळून आले. दिनांक १ ते ८ जानेवारीदरम्यान २७ शेतकऱ्यांचे नोंदणी नसताना धान खरेदी झाल्याची माहिती समोर आली. तसेच वजन पावती न देता धान खाली करून घेतल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी मांडल्या.
पंचनामा दरम्यान स्टॉक रजिस्टर, सातबारा व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. गोदामातील धान पोत्यांची शास्त्रोक्त मांडणी नसल्याने प्रत्यक्ष साठ्याची मोजणी करणे शक्य झाले नाही. केंद्र व्यवस्थापकांच्या माहितीनुसार दिनांक १२ जानेवारी २०२६ अखेर ४६५८.४० क्विंटल धान खरेदी झाल्याचे नमूद करण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी केली आहे.
त्या प्रसंगी : धनपाल मिसार सर, परशुराम ठाकरे, सागर वाढई अध्यक्ष मनोज मने, मॅनेजर माकडे, उपस्थित होते






