चामोर्शीत नगरसेवक पति पत्नीचे , अगरबत्ती प्रकल्प घोटाळा; २३ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, न्याय न मिळाल्यास पीडित महिलांचा आत्मदहनाचा इशारा
वृत्तवानी गडचिरोली न्यूज
गडचिरोली , ता. ९ : चामोर्शी नगरपरिषद क्षेत्रात अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली गरीब महिला, शेतकरी व शेतमजुरांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप चामोर्शीचे नगरसेवक आशिष अरुण पिपरे व त्यांची पत्नी नगरसेविका सोनाली आशिष पिपरे यांच्यावर करण्यात आला आहे. या संदर्भात पीडित महिला व पुरुषांनी आज (ता.९) पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली.
पीडितांच्या म्हणण्यानुसार, सन २०२० मध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत अगरबत्ती प्रकल्प उभारून रोजगार देण्याचे आमिष दाखवून सुमारे ४० महिलांना बँक कर्ज मिळवून देण्यात आले. मात्र कर्जमाफी व रोजगाराच्या आश्वासनाआड कर्जाची रक्कम स्वतःच्या नावाने वळती करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रारंभी लाभार्थी महिलांच्या खात्यात केवळ १० हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर बँकेशी संगनमत करून प्रत्येकी सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेण्यात आले. पुढे लाभार्थ्यांच्या खात्यातून जवळपास दोन लाख रुपयांची रक्कम विविध मार्गांनी काढून घेतल्याचा आरोप पीडितांनी केला.
प्रकल्पासाठी गुजरातमधील अहमदाबाद येथील हरीकृष्ण इंजिनिअरिंग कंपनीचे प्रति मशीन एक लाख रुपयांचे कोटेशन दाखवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र सुमारे २५,५०० रुपये किमतीच्या हलक्या प्रतीच्या अगरबत्ती मशीन खरेदी करण्यात आल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. ही मशीन लाभार्थ्यांना न देता आरोपींच्या ताब्यात ठेवून खासगी जागेवर प्रकल्प सुरू करण्यात आला. अवघ्या सहा महिन्यांतच हा प्रकल्प बंद पडला.
प्रकल्प बंद झाल्यानंतर महिलांना बँकांकडून कर्जफेडीच्या नोटिसा येऊ लागल्या. रोजगार किंवा मशीनची मागणी केल्यावर, “तुम्ही कंपनीचे सदस्य आहात, कर्ज तुम्हालाच भरावे लागेल,” असे सांगून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. गेल्या तीन वर्षांपासून कर्जमाफीचे आश्वासन देत वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर बँकांनी न्यायालयात दावा दाखल केल्याने महिलांना २.५ ते ३ लाख रुपयांच्या नोटिसा प्राप्त झाल्या आहेत.
या प्रकरणाची तक्रार एप्रिल २०२५ मध्ये नागपूर येथे झालेल्या मुख्यमंत्री जनता दरबारात दाखल करण्यात आली होती. चौकशीचे आदेश होऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप पीडितांनी केला.
याच प्रकरणात पीडित महिला सौ. वंदना सविंद्र कोठारे यांची ट्रॅक्टर व्यवहारात सुमारे ७.५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचाही आरोप असून, तक्रार देऊनही कारवाई न झाल्याचे सांगण्यात आले.
या कथित फसवणुकीमुळे अनेक कुटुंबांवर कर्जाचा बोजा वाढून तीव्र मानसिक तणाव निर्माण झाला आहे. विविध लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकाऱ्यांकडे निवेदने देऊनही न्याय न मिळाल्याने, पीडितांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पीडित महिलांनी आशिष पिपरे व सोनाली पिपरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची, तसेच कथित बेकायदेशीर संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या संदर्भात संपर्क साधला असता आशिष पिपरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या राजकीय वाटचालीमुळे बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे स्पष्टीकरण दिले.
पीडित महिला व पुरुषांची नावे :
सौ. कविता दिलीप किरमे, सौ. मीनाक्षी देवराव पिपरे, सौ. देवांगना महेश गौतम, सौ. निवृत्ता प्रकाश गव्हारे, सौ. शीला पुरुषोत्तम धोडरे, सौ. कविता रवी कारडे, सौ. सुषमा सतीश धोडरे, सौ. रेखा सुनील गव्हारे, सौ. छाया उमाजी बोदलकर, सौ. मेनू विनोद धोडरे, सौ. अनिता गुणवंत पिपरे, सौ. मनीषा योगेश्वर गव्हारे, सौ. सुषमा राजेश बुरांडे, सौ. अर्चना किशोर बुरांडे, सौ. शारदा बबन पिपरे, सौ. साधना बाळा धोडरे, सौ. जयश्री रमेश पिपरे, सौ. वंदना सविंद्र कोठारे, सौ. अर्चना सुनील धोडरे, श्री. चंद्रशेखर हरिश्चंद्र मस्के, श्री. ओमदास कवडू झरकर, श्री. नितेश दत्तू पिपरे, श्री. मिलिंद नामदेव भांडेकर, सौ. आश्विनी धराराज गंधारे.






