Home Breaking News ४ लेबर कोडच्या विरोधात एटापल्ली तहसील कार्यालयावर लाल लाट

४ लेबर कोडच्या विरोधात एटापल्ली तहसील कार्यालयावर लाल लाट

210

४ लेबर कोडच्या विरोधात एटापल्ली तहसील कार्यालयावर लाल लाट

 

एटापल्ली, १२ फेब्रुवारी २०२६:

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व कॉर्पोरेटधार्जिण्या ४ लेबर कोडच्या निषेधार्थ सेंट्रल ट्रेड युनियन आणि संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत अहेरी विधानसभा क्षेत्रात आज ऐतिहासिक आम हडताल यशस्वी ठरली. अहेरी विधानसभा क्षेत्रात सर्वत्र काम बंद ठेवण्यात आले असून संघटित व असंघटित कामगारांनी एकजुटीची ताकद दाखवली.

 

आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, सफाई कामगार, कंत्राटी कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर व इतर कष्टकरी वर्गाने संपात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक ठिकाणी शासकीय व निमशासकीय कामकाज ठप्प राहिले. “४ लेबर कोड रद्द करा”, “कामगार-शेतकरी एकता जिंदाबाद”, “कामाचे तास वाढवणे बंद करा”, “कॉर्पोरेट राजवट हद्दपार करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

 

आंदोलकांनी एटापल्ली तहसील कार्यालयाला धडक देत प्रशासनाला मागणीपत्र सादर केले. निवेदनात ४ लेबर कोड तात्काळ रद्द करावेत, कामाचे तास वाढविण्याचा निर्णय मागे घ्यावा, ८ तासांचा कामाचा दिवस कायम ठेवावा, किमान वेतनाची कायदेशीर हमी द्यावी, कंत्राटीकरण थांबवावे, कामगारांना सामाजिक सुरक्षा व नोकरीची हमी द्यावी, अशा ठाम मागण्या मांडण्यात आल्या.

 

या संघर्षाचे नेतृत्व कॉ. सचिन मोतकुरवार (अध्यक्ष, आयटक – अहेरी विधानसभा) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ. सुरज जक्कुलवार, कॉ. शुभम वननमवार, कॉ. रितेश जोई, कॉ. विशाल पुज्जलवार, कॉ. चंदू कंबलवार, कॉ. पदमा मावणुरवार, कॉ. रवी अलोने, कॉ. पांडू कोरसा, कॉ. सुरेश मज्जी, कॉ. ओंडरे ताई तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी संप यशस्वी केला.

 

यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार यांनी ठामपणे सांगितले की, “४ लेबर कोडमुळे कामगारांचे हक्क हिरावले जात असून कामाचे तास वाढवून शोषण अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ८ तासांच्या ऐतिहासिक लढ्याने मिळविलेल्या हक्कांवर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. कामगार-शेतकरी एकजुटीच्या बळावर हे कायदे रद्द करूनच राहू.”

 

अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वत्र झालेल्या कामबंद व एटापल्ली तहसील कार्यालयाला दिलेल्या धडकेमुळे आजची हडताल प्रभावी, लढाऊ व निर्धारपूर्ण ठरली. कष्टकरी वर्गाने आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी निर्णायक संघर्षाची दिशा स्पष्ट केली आहे.

Don`t copy text!