राज्यात 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा
मेघगर्जना, विजांचा कडकडाट व गारपिटीची शक्यता; शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी
राज्यात पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान अनेक भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव राज्यातील अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे. पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग तसेच विदर्भातील अमरावती परिसरातही मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या कालावधीत काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, शेतीची कामे हवामानाच्या अंदाजानुसार नियोजित करावीत तसेच वादळी वारे व संभाव्य गारपिटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






