एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई; थारसह १४.९० लाखांची अवैध दारू जप्त
गुप्त माहितीवरून सापळा; गडचिरोलीतील युवकावर गुन्हा दाखल
एटापल्ली, दि. २० :
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर एटापल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या कारवाईत दारूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी अशी १४ लाख ९० हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीवर प्रभावी कारवाई सुरू आहे. त्यानुसार १९ एप्रिल रोजी एटापल्ली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, एका चारचाकी वाहनातून पोस्टे एटापल्ली हद्दीत देशी व विदेशी दारूची अवैध तस्करी केली जाणार आहे.
या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली व पोस्टे एटापल्ली येथील पोलीस पथकाने विविध मार्गांवर सापळा रचला. दरम्यान एमएच-३२ एएस-७०९९ क्रमांकाचे चारचाकी वाहन नारानूर–ताडपल्ली मार्गे लांझी गावाकडे येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली.
पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता रॉकेट संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या २९ सिलबंद पेट्या तसेच बिअरची एक पेटी असा अवैध साठा आढळून आला. या दारूची अंदाजे किंमत २ लाख ९० हजार रुपये आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा थार वाहन अंदाजे १२ लाख रुपये किंमतीचे असल्याचे निष्पन्न झाले.
यावरून पोलिसांनी दारूसह वाहन असा एकूण १४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी मयूर विजय बालमवार (रा. वार्ड क्र. ७, गडचिरोली) याच्याविरुद्ध पोस्टे एटापल्ली येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), ८३ तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि. ज्ञानेश्वर कोल्हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. व उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे एटापल्लीचे प्रभारी अधिकारी मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने पार पाडली.







