अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट.
रुग्णांशी साधला थेट संवाद.
अहेरी :- अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांच्या तब्येतीची आत्मीयतेने विचारपूस केली, तसेच रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांबाबत समाधान जाणून घेतले.
राजेंनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत औषधांचा पुरवठा, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, तसेच रुग्णांसाठी असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांची तपासणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रुग्णालयातील कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.
अहेरी उपजिल्हा रुग्णालय हे परिसरातील पाचही तालुक्यांतील रुग्णांसाठी प्रमुख आरोग्य केंद्र असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यामुळे सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना राजेंनी यावेळी दिल्या.तसेच, रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळणे हीच खरी सेवा असून, आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही दिल्या.
राजेंच्या या अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनात चांगलीच हालचाल निर्माण झाली असून, आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
प्रसंगी कुमार अवधेशरावबाबा आत्राम,तालुका अध्यक्ष विकास तोडसाम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







