Home Breaking News *विद्यार्थी व पालकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आदिवासी आश्रम शाळेत प्रवेश क्षमता...

*विद्यार्थी व पालकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आदिवासी आश्रम शाळेत प्रवेश क्षमता वाढवा : – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके*

22

*विद्यार्थी व पालकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आदिवासी आश्रम शाळेत प्रवेश क्षमता वाढवा : – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. २५ : विद्यार्थी व पालकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देत शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीच्या वतीने आयोजित नागपूर विभागीय एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आमदार डॉ मिलिंद नरोटे, आदिवासी आयुक्त लीना बनसोड, सह सचिव म.रं. शेळके, उप सचिव र.तु.जाधव, नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह , नाशिक विभागाचे उप आयुक्त संतोष ठुबे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

पुढे बोलतांना मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले की, आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, निवास व भोजनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सर्व सुविधांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवून त्यांचा विश्वास संपादन करणे अत्यावश्यक आहे. पालकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या शंका दूर कराव्यात व शिक्षणाकडे त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करावा.

 

डॉ. उईके यांनी पुढे नमूद केले की, आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी “विद्यार्थी केंद्रबिंदू” ठेवून कार्य करणे गरजेचे आहे. ज्या आश्रमशाळांमध्ये आवश्यक सुविधा अपुऱ्या आहेत, त्या तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. स्वच्छता, शिस्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण या बाबींवर विशेष भर देत शाळांचे वातावरण विद्यार्थ्यांना आकर्षक बनवावे, असेही त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी “माझी शाळा, माझा फळा” या जनजागृतीपर व्हिडिओ जिंगलचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी योग्य दिशा मिळेल, असे सांगत अधिकाधिक विद्यार्थ्यांचे आश्रमशाळांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

 

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी प्रास्ताविकात शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा प्रभावी प्रचार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

 

या कार्यशाळेस आदिवासी विकास विभागाचे कक्ष अधिकारी स.वि. कोवे, प्रकल्प अधिकारी अरुण एम., अमर राऊत यांच्यासह नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, तसेच ७६ आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक व गृहपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

०००००

Don`t copy text!