*वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत महायुतीचा भाजपचे अरुण लखानी बिनविरोध*
चंद्रपूरः- विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वीच महायुतीने विजय मिळवला आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लखानी यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने महायुतीने निवडणुकीपूर्वीच विजयाचा गुलाल उधळला आहे.
विधान परिषदेच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या जागेसाठी भाजपने ज्येष्ठ उद्योजक अरुण लखानी यांना रिंगणात उतरवले होते. या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती लखानी यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
परंतु, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसचे शैलेश अग्रवाल आणि अपक्ष सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी अचानक आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. विरोधी उमेदवारांनी मैदान सोडल्यामुळे अरुण लखानी यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
कॉग्रेसने ऐनवेळी घेतलेल्या या माघारीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे महायुतीने निवडणुकीआधीच आपले खाते उघडून विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण केला आहे या विजयानंतर अरुण लखानी यांच्यावर राजकीय स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






