भरधाव कारची दुचाकीला भीषण धडक; तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी
एटापल्ली, प्रतिनिधी :
एटापल्ली तालुक्यातील आलंदी गावाजवळ गुरुवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली.
या अपघातात अनिल हिचामी (वय २८, रा. परसलगोंदी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बालाजी दुर्वा (रा. परसलगोंदी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण, कार चालकाची ओळख आणि इतर बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या दुर्दैवी घटनेमुळे परसलगोंदी गावासह संपूर्ण परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.






