भयावह! गंगेत तरंगणारे 71 मृतदेह बाहेर काढले, कोरोनाने मृत्यू झाल्याचा संशय.

131

मृतदेहांना अग्नी न देता ते गंगेमध्ये सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

मृतदेह उत्तर प्रदेशातूनच वाहून आले.

स्मशानघाटावर नोंदणीही होत नाही.

बिहारमध्ये बक्सर भागात गंगा नदीच्या पात्रामध्ये आतापर्यंत 71 जणांचे मृतदेह सापडले आहेत. हे सगळे मृतदेह कोरोनामुळे दगावलेल्यांचे असावेत असा दाट संशय आहे. अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्याने हे मृतदेह गंगेत टाकले असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बक्सरचे पोलीस अधीक्षक नीरज कुमार सिंह यांनी गंगा नदीच्या किनारी असलेल्या चौसा नावाच्या भागातून हे मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले आहे.

द हिंदू या वर्तमानपत्राच्या पत्रकाराशी बोलताना पोलीस अधीक्षक सिंह यांनी ही माहिती दिली आहे. बिहारमध्ये गंगेच्या पात्रात मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ माजली आहे. कालपर्यंत नदीत 40 मृतदेह सापडले होते, ज्यांची संख्या आता 71 पर्यंत पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बक्सरमधील गंगा नदीच्या घाटांजवळ हे मृतदेह स्थानिकांना दिसून आले. अंत्यसंस्काराला जागा आणि साहित्य न मिळाल्याने गंगेत सोडण्यात आलेले हे कोरोनाग्रस्तांचे मृतदेह असावेत अशी चर्चा सुरू झाल्याने ग्रामस्थांची भीतीने अक्षरशः गाळण उडाली आहे. हे मृतदेह बिहारचे आहेत की उत्तर प्रदेशातून वाहून आले याचा शोध जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे.

कोरोना महामारीमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद आणि वाराणसीच्या घाटावर तर सतत चिता जळत आहेत. अंत्यसंस्कारासाठी तासनतास जागा न मिळाल्याने अनेक जण मृतदेह गंगेमध्ये प्रवाहित करत असल्याचेही वृत्त आहे. अशीच परिस्थिती बिहारमध्येही आहे. बिहारच्या बक्सरमधील चरित्रवन आणि चौसा स्मशानघाटावर रात्रंदिवस चिता जळत आहेत.

स्मशानघाटावर नोंदणीही होत नाही.

मृतदेहांची बक्सरमध्ये गंगेत आढळलेले मृतदेह हे बिहारमधील आहेत की उत्तर प्रदेशातील याचा शोध पोलीस घेत आहेत. बक्सरमध्ये रविवारी 76 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. तर 100 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. रोज सुमारे 20 पेक्षा अधिक मृतदेहांची स्मशानघाटावर नोंदही होत नाही. चौसा स्मशानघाटावर 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले ज्यातील सात मृतदेहांना अग्नी न देता ते गंगेमध्ये सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

मृतदेह उत्तर प्रदेशातूनच वाहून आले

बक्सरचे विशेष जिल्हा अधिकारी के. के. उपाध्याय यांनी गंगा नदीमध्ये 12 मृतदेह तरंगताना आढळल्याची माहिती दिली. ते मृतदेह 5 ते 7 दिवसांपूर्वीचे आहेत असे सांगतानाच ते उत्तर प्रदेशातून वाहून आले असावेत अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. चौसाचे बीडीओ अशोक कुमार यांनीही तेथील महादेवा घाटावर गंगाकिनारी आढळलेले मृतदेह स्थानिक नसल्याचा दावा केला.