राष्ट्रवादी अभिप्राय उपक्रमानंतर ‘परिवार संवाद’ दौर्याला राष्ट्रवादीच्या शिलेदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – जयंत पाटील
यवतमाळ जिल्हयातील वणी येथे आढावा बैठक…
यवतमाळ दि. २९ जानेवारी -:- राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय नावाचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने राबवला होता. महाराष्ट्रभरातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचा पुढचा टप्पा हा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा असून यालाही राष्ट्रवादीचे शिलेदार उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यवतमाळ जिल्हयातील वणी येथे केले.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा दुसरा दिवस असून यवतमाळ जिल्हयातील वणी येथे आज आढावा बैठक पार पडली.
तुमचे – आमचे लाडके नेते आदरणीय शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा हा राष्ट्रवादी पक्ष आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या होत्या. तेव्हा कृषीमंत्री म्हणून पवारसाहेबांनी त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून मोठे पॅकेज जिल्ह्याला मिळवून दिले होते याची आठवण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वणीकरांना करुन दिली.
पवारसाहेबांच्या विचारांचा प्रसार आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपल्याला या भागात कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करायची आहे. एक भक्कम संघटना उभी करायची त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
यावेळी माजी मंत्री रमेश बंग, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हाध्यक्ष व माजी आमदार ख्वाजा बेग, आमदार इंद्रनील नाईक,नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.






