गडचिरोली – चिमूर लोकसभेसाठी १९ एप्रिल रोजी मतदान,२० मार्च पासून नामनिर्देशन पत्र भरणे सुरू

41

लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली – चिमूर आणि भंडारा – गोंदिया या पाच लोकसभा क्षेत्रात मतदान होणार आहे. त्यासाठी १९ मार्च रोजी नोटीफिकेशन काढले जाणार असून २० ते २७ मार्च पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करता येतील अशी माहिती गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली

गडचिरोली लोकसभा क्षेत्रात १६ लक्ष १३ हजार ९६ मतदार यावेळी आपला मताधिकार बजावतील. यात ८ लक्ष २०५ पुरुष, ७ लक्ष ९९ हजार ४०२ स्त्रिया तर १२ ट्रांसजेंडर आहेत. एकुण १८८६ मतदार केंद्रांवर १५ हजारांहून अधिक निवडणूक कर्मचारी काम करतील तर २० हजारांहून अधिक पोलीस, सी आर पी एफ, एस आर पी एफ आणि इतर सुरक्षा दलाचे जवान कार्यरत राहणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडली जाईल यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. संपूर्ण निवडणूक पारदर्शी होणार असुन धन, बल शक्तींना थारा दिला जाणार नाही. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे ते म्हणाले. कोणत्याही गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मतदारांनी सजग राहून सी व्हिजिल या एप वर गैरप्रकारांचे फोटो, व्हिडिओ टाकले तर आयोगाकडून १०० मिनिटात कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले