भामरागड तालुक्यातील हिदुर गावात रानटी हत्तीने धुडगूस घालून तीन महिलांना केले गंभीर जखमी

54

भामरागड तालुक्यातील कियर येथील एका शेतक-यास दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच जंगली हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले. महारी देवू वड्डे (वय ५०), राजे कोपा आलामी (५०) आणि वंजे जुरू पुंगाटी अशी जखमी महिलांची नावे आहेत.

 

तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून तीन दिवसांपूर्वी रानटी हत्तीने भामरागड तालुक्यात प्रवेश केला. काल पहाटे या तालुक्यातील कोसफुंडी गावात सर्वप्रथम हत्तीचे दर्शन झाले. त्यानंतर तो कारमपल्ली-टेकला जंगलात गेला. त्यानंतर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कियर येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या गोंगलू तेलामी नामक शेतक-यास हत्तीने ठार केले. त्यानंतर हा हत्ती त्या भागातून पसार होऊन आरेवाडा परिसरातील हिदूर या गावात गेला. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याने महारी वड्डे, राजे आलामी व वंजे पुंगाटी यांना गंभीर जखमी केले.

तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एका महिलेचे दोन्ही पाय व पोटाला गंभीर इजा झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे, तर दोघींना कायम अपंगत्व येण्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे