*गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी जागतिक ज्ञानाची दारे उघडणार*
*’द हिंदू ग्रुप’ सोबत जिल्हा प्रशासनाचा सामंजस्य करार*
*विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार वाचनसामग्री*
गडचिरोली दि. ३१: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जागतिक घडामोडींशी जोडण्यासाठी आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून त्यांची
शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘द हिंदू ग्रुप’ची विशेष शैक्षणिक पुस्तके आणि टॅब्लॉइड्स मोफत उपलब्ध करून दिली जाणार असून, या शैक्षणिक साहित्याचा संपूर्ण खर्च जिल्हा प्रशासनामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम व विशेष सहाय्य योजनेतून केला जाणार आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय व द हिंदू ग्रुप यांच्यामध्ये याबाबत सामंजस्य करार करण्यात आला.
ही विशेष प्रकाशने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहेत. यामध्ये प्राथमिक विभागातील ५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी ‘द हिंदू यंग वर्ल्ड’ हे साप्ताहिक दिले जाईल, ज्यात विज्ञान, इतिहास आणि रंजक खेळांचा समावेश असतो. तसेच, माध्यमिक विभागातील ११ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘द हिंदू इन स्कूल – संडे वीकेंडर’ हे ३२ पानांचे टॅब्लॉइड दिले जाणार आहे, ज्यामध्ये चालू घडामोडी, वैज्ञानिक शोध आणि विविध कोडी यांसारखा माहितीपूर्ण मजकूर असेल.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या उर्वरित कालावधीसाठी ही पुस्तके दर आठवड्याला थेट शाळांमध्ये पोहोचवली जाणार असून, या दर्जेदार शैक्षणिक साहित्यामुळे गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी सांगितले गेले.






