पैलवानानी मदत मागण्यापेक्षा मदत करायची भावना ठेवली पाहिजे – हिंदकेसरी पै.संतोष आबा वेताळ यांचे प्रतिपादन
महाराष्ट्राच्या पैलवानांनी कोणाला मदत मागण्यापेक्षा मदत देण्याची भावना ठेवली पाहिजे.हजारो जोर,बैठका मारणारा पैलवान स्वाभिमानी असला पाहिजे असे प्रतिपादन हिंदकेसरी पै.संतोष वेताळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ आयोजित पहील्या पंच प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला केले.
त्यांच्या मनोगताच्या भाषणात ते म्हणाले की गेली अनेक वर्षे अनेक पैलवानांना म्हातारपणी आर्थिक मदतीची गरज आहे असे लेख, आवाहन वाचण्यात येते.ते वाचत असताना जीव तीळतीळ तुटतो.जगाला मदत मागायची वेळ कोणत्याही पैलवानावर येऊ नये.याउलट इतरांना आपण मदत करायची भावना ठेवली पाहिजे. जगासमोर आपल्या आर्थिक दुरबलतेचे आवाहन आपण देत बसलो तर येणाऱ्या पिढ्या किंवा जो पैलवान कुस्तीत सध्या करियर करत आहे त्यांच्याकडे चुकीचा संदेश जाऊन एकंदरीत खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो.पुणे जिल्ह्यातील पैलवानांचे त्यांनी उदाहरण पुढे ठेवत म्हणाले की आपण कधी आयुष्यात पुण्यातील पैलवानांना आर्थिक मदत हवी आहे असे ऐकले आहे का..? याउलट पुण्यातील पैलवानच सगळ्यांच्या मदतीला सर्वात पुढे असतात.त्यांच्यातील तो स्वाभिमान आपण सगळ्यांनी पुढे ठेवला पाहिजे.मदत मागण्याची आणि देण्याची सुद्धा वेगळी पद्धत असते.आमच्या सारख्याना सुद्धा आर्थिक मदत लागतच असते पण ती मदत नक्कीच वेगळी असते.व्यापार,उद्योगाला मदत मागा पण आयुष्यभर अर्थार्जन न करता शेवटी जर मदत मागितली तर ते आपल्या क्षेत्रासाठी चुकीचा संदेश देऊन जाईल.व्यासपीठावर उपस्थित असणारे डबल उप महाराष्ट्र केसरी पै.बाळासाहेब पडघम यांचे उदाहरण देत ते म्हणाले की बाळू भाऊ धाराशिव जिल्ह्यातून ऊस तोडणी कामगार म्हणून आले आणि स्वतःच्या मनगटावर महाराष्ट्राचे व देशाचे मोठे पैलवान झाले.स्वतःला शिक्षण मिळाले नाही म्हणून सध्या त्यांनी इंग्रजी माध्यमातून शाळा कॉलेज सुरू केली आहेत.गोर गरिबांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ते देतात.व्यापार उद्योगात त्यांचे मोठे नाव आहे.स्वतः शिक्षण नाही म्हणून किंवा नोकरी नाही म्हणून नशिबाला दोष देत ते बसले नाहीत तर अहोरात्र कष्ट करून आज करोडपती आहेत.आपला पैलवान हा बाळू पडघम यांच्यासारखा स्वाभिमानी हवा आहे.
पंच प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी पंचांच्या 3 दिवसांच्या जेवण खाणे व इतर सर्व खर्च स्वतः संतोष आबा यांनी कर्तव्य म्हणून केला.3 दिवस स्वतः सगळ्या गोष्टीत त्यांनी वेळ दिला.समारोपाच्या त्यांच्या भाषणाने सारेच भावून झाले.त्यांनी गंगावेश तालीम कोल्हापूर व वस्ताद विश्वास हारुगले यांचे उदाहरण देत म्हणाले की आमच्यात हा स्वाभिमान आमच्या वास्तदानी शिकवला.कुस्ती सम्राट अस्लम काझी पासून ते आत्ताच्या माऊली जमदाडे पर्यंत स्वाभिमानी पैलवान त्यांनी तयार केले.त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आम्ही आत्ता कुस्ती निवृत्तीनंतरसुद्धा सुखाचे जीवन जगत आहोत.