Home Breaking News जांबिया गट्टा 33/11 वीज उपकेंद्रावर ‘ताला ठोको’ आंदोलन- भांडवलशाहीच्या गलथान यंत्रणेविरोधात जनतेचा...

जांबिया गट्टा 33/11 वीज उपकेंद्रावर ‘ताला ठोको’ आंदोलन- भांडवलशाहीच्या गलथान यंत्रणेविरोधात जनतेचा तळतळाट

127

जांबिया गट्टा 33/11 वीज उपकेंद्रावर ‘ताला ठोको’ आंदोलन- भांडवलशाहीच्या गलथान यंत्रणेविरोधात जनतेचा तळतळाट

जांबिया गट्टा | दिनांक 02 जून 2023

एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी अखेर अन्यायकारी व्यवस्थेविरुद्धचा लढा सुरू केला आहे. महावितरणच्या मनमानी बेजबाबदार कारभाराने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भा.क.पा.) नेतृत्वाखाली जांबिया गट्टा येथील 33/11 के.व्ही. उपकेंद्रावर “ताला ठोको” आंदोलन छेडत शासन व व्यवस्थेला सुधारणा करा असा इशारा दिला — की आता सहनशक्तीचा बांध फुटला आहे.

गलथान व्यवस्थापन आणि भांडवलशाहीची सावली

महावितरणसारख्या सार्वजनिक उपक्रमाच्या कार्यपद्धतीत आज खाजगीकरणाचे सावट स्पष्टपणे दिसत आहे. मुनाफ्याच्या हव्यासाने लोकसेवेला तोंड फोडणाऱ्या शासकीय धोरणांचे थेट परिणाम आता ग्रामीण भागात दिसू लागले आहेत. यंत्रणा फक्त शहरी आणि भांडवली केंद्रांच्या सेवेसाठी झुकत आहे, आणि आदिवासी व शेतीप्रधान ग्रामीण भाग उपेक्षितच राहत आहेत.

एटापल्ली तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून अंधारात जगत आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, लाईन दुरुस्ती वेळेत होत नाही, कर्मचारी अनुपस्थित असतात, आणि स्थानिक तक्रारी पूर्णतः दुर्लक्षित केल्या जात आहेत. हे केवळ निष्काळजीपणाचे उदाहरण नसून, ही भांडवलशाहीच्या हितसंबंधांना झुकणाऱ्या शासकीय धोरणांची फळं आहेत.

भा.क.पा.चा लढा – ‘ताला ठोको’ आंदोलन

या सगळ्या परिस्थितीविरोधात आवाज बुलंद करत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भा.क.पा.) अहेरी विधानसभा क्षेत्राच्या नेतृत्वाखाली दिनांक २ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जांबिया गट्टा येथील 11/33 के.व्ही. उपकेंद्रावर “ताला ठोको” आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन म्हणजे एका थांबलेल्या संयमाचा उद्रेक होता. उपस्थित नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी “जनतेला अंधारात ठेवणाऱ्या व्यवस्थेवर ताला ठोका!” अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

मागण्या – फक्त दिखावी सेवा नाही, अधिकार हक्क व न्याय हवा!

भा.क.पा.ने आंदोलनात खालील मुख्य मागण्या ठामपणे मांडल्या:

1. गट्टा उपकेंद्रावर तीन नवीन वायरमन तातडीने नियुक्त करावेत.

2. सध्याचे कामचुकार वायरमन आणि अनुपस्थित ऑपरेटरवर कार्यवाही व्हावी.

3. उपस्थित नसलेल्या चार ऑपरेटरपैकी केवळ एकच कार्यरत असल्याचे दिसून आले आहे – यावर शिस्तभंगाची कार्यवाही आवश्यक.

4. मुरेवाडा, नैताला, कॉईनवर्षी, हाचबोडी आणि रेकलमेट्टा या गावांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही – ही अन्यायाची परिसीमा आहे.

5. तीन फिडरवर ६० गावांचा भार असल्याने अधिक तीन फिडर आणि वायरमन पुरवावेत.

6. गट्टा क्षेत्रासाठी स्वतंत्र वितरण केंद्र स्थापन करावे.

7. ऑपरेटर आणि वायरमन यांना गट्टा मुख्यालयात वास्तव्यास बांधील करावे.

8. झाडांची मान्सूनपूर्व छाटणी न झाल्याने धोका वाढतोय – तातडीने कारवाई व्हावी.

9. बाजारातील विद्युत तारांच्या धोकादायक स्थितीवर उपाययोजना करावी.

10. सुरजगड स्टेशनवर वीज खंडित झाल्यावर पुनःपुरवठा उशिरा होतो – एक जबाबदार कर्मचारी नेमावा.

11. गुडुंजूर गावातील नागरिकांनी स्वतः पोल लावले, त्या खर्चाची भरपाई द्यावी.

लोकशक्तीचा एल्गार

या आंदोलनात प्रमुख नेतृत्व –

• कॉ. सचिन मोतकुरवार – अध्यक्ष, भा.क.पा. अहेरी विधानसभा

• श्री सैनू गोटा – माजी जि.प. सदस्य

• कॉ. सूरज जककुलवार – जिल्हा कौन्सिल सदस्य भाकपा

• तसेच कॉ. रामदास उसेंडी ,कॉ. विष्णु हिचामी ,कॉ. रवी अलोन ,अनेक भा.क.पा. कार्यकर्ते, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी झालेल्या भाषणात कॉ. सचिन मोतकुरवार यांनी जोरदार शब्दांत प्रशासन आणि महावितरणला धारेवर धरले. “ही व्यवस्था सामान्य जनतेच्या सेवेपेक्षा भांडवलदारांच्या मक्तेदारीकडे वळली आहे. ही कंपनीच्या नावाखाली चालणारी लूट बंद झालीच पाहिजे,” असे ठाम मत त्यांनी मांडले.

पुढील लढ्याची भूमिका

भा.क.पा.ने स्पष्ट इशारा दिला आहे की जर वरील मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर पुढील काळात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. “ही केवळ सुरुवात आहे – लढा अंधाराविरुद्ध आहे, लढा अन्यायाविरुद्ध आहे, लढा भांडवलशाहीच्या नाकावर टिच्चून उभा राहिलेल्या जनतेचा आहे,” असा हुंकार कार्यकर्त्यांनी दिला.

Don`t copy text!