*डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गीताताई हिंगे सन्मानित*
मुंबई: दि. १०-६-२०२५
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार गडचिरोलीच्या गीतताई हिंगे यांना यशवंतराव चव्हाण सभागृह ,नरिमन पॉईंट,मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट ,मृद व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड , कॅबिनेट मंत्री भरतजी गोगावले तसेच सामाजिक विभागाचे प्रधान सचिव हर्षदिपजी कांबळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह ,प्रमाण पत्र ,राज वस्त्र तसेच ७५ हजार रुपये धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गडचिरोलीसारख्या आदिवासी नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी आधारविश्व फाऊंडेशन ही महिलांची संस्था स्थापन करून गेली अनेक वर्षापासून त्या माध्यमातून अनेक महिलांना सोबत घेऊन त्यांनी जिल्ह्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. महिलांचे सक्षमीकरण , किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर ,ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण , प्लास्टिक प्रदूषण याविषयी समाजात जनजागृतीपर उपक्रम, आदिवासी नक्षल भागात जाऊन गरजूंना मदत करने असे एक ना अनेक उपक्रम आधारविश्व फाऊंडेशन च्या माध्यमातून राबवीले.कोरोना काळात कुणी चीटपाखरू बाहेर दिसत नव्हता त्यावेळी आधारविश्व फाऊंडेशन गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना रुग्णांचा आधार बनला. एवढेच नाहीतर ज्यांचे नातेवाईक अंतिम संस्कार करायला तयार नव्हते अश्या कोरोनाने मृत झालेल्या मृतदेहाचे स्वतः महिलांना सोबत घेऊन स्मशान घाटात जाऊन त्यांच्यावर विधिवत अंतिम संस्कार देखील केले. गडचिरोली जिल्ह्यात गीतताईंचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रामाणिक, निःस्वार्थ समाजसेवेची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.
*महाराष्ट्र शासनाने माझ्या कार्याची दखल घेऊन माझी या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल सरकारचे मनापासून आभार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीच्या नावाने पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजते. आणि अश्या पुरस्काराने माझ्या कामाची जबाबदारी अजून वाढली आहे. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून मला या कार्यात साथ देणाऱ्या सर्व आधारविश्व फाऊंडेशनच्या सहकारी मैत्रिणींचा आहे. म्हणून मी हा पुरस्कार आधारविश्व फाऊंडेशन ला समर्पित करते. यापुढेही मी सर्वांना सोबत घेऊन समाजासाठी जेवढं करता येईल ते निस्वार्थ भावनेने करील* असे मनोगत गीताताई हिंगे यांनी व्यक्त केले. अतिशय मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






