*आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू*
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. स्थानिक तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, एटापल्ली, भामरागड, धानोरा, कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा, वडसा (देसाईगंज) आणि आरमोरी या सर्व तालुक्यांतील आय.टी.आय. संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जात आहे. यामध्ये आरेखक, स्थापत्य, इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, वायरमन, कोपा, मेकॅनिक मोटर वाहन, ड्रेस मेकिंग, डाटा एंट्री ऑपरेटर इत्यादी रोजगाराभिमुख कोर्सचा समावेश आहे.
या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान १० वी उत्तीर्ण, तर काही कोर्ससाठी ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पात्रता आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गडचिरोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अर्ज भरण्याच्या वेळी विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, जात प्रमाणपत्र (लागल्यास) इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. प्रवेश घेतल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांद्वारे अप्रेंटिसशिप, नोकरी मेळावे व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
अधिक माहितीसाठी स्थानिक आय.टी.आय. कार्यालयाशी किंवा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा. तसेच इच्छुकांनी प्रवेशासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन गडचिरोली आय.टी.आय.चे प्राचार्य एस. एस. चौधरी यांनी केले आहे.