गुडुंजूर गावात भाकपच्या संघर्षाला यश — पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांसह शाळा सुरू, शासकीय शिक्षकाची नेमणूक
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी भाग असलेल्या गुडुंजूर गावात आज एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) व स्थानिक ग्रामस्थांच्या दीर्घ संघर्षानंतर, गावात पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गांसह जिल्हा परिषद शाळा औपचारिकपणे सुरू झाली असून शाळेसाठी एक शासकीय शिक्षकही नेमण्यात आला आहे.
गावात यापूर्वी कधीही शाळा सुरू झाली नव्हती. मात्र, मागील वर्षी स्थानिक ग्रामसभेच्या ठरावाच्या आधारे पूर्व-प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर भाकपच्यावतीने सातत्याने शाळा पूर्ण स्वरूपात सुरू करावी व शिक्षक नेमावा यासाठी मागणी केली जात होती.
आज त्या मागणीला यश आले असून, आता गुडुंजूर गावातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावीच शिक्षण मिळणार आहे. मात्र, अद्याप शाळेसाठी आवश्यक इमारत उपलब्ध नाही. याबाबत लवकरच आणखी मागणी करून इमारत उभारण्यासाठी दबाव वाढवण्यात येईल, असे कॉ. सत्तू हेडो (किसान सभा तालुका उपाध्यक्ष) यांनी स्पष्ट केले.
या ऐतिहासिक क्षणी अविका गर्देवाडा सचिव विलास नरोटी, गावाचे पाटील दुलसा पुंगाटी, किसान सभा शाखा अध्यक्ष शंकर आत्राम, सचिव शेबू पुंगाटी, चेतन पुंगाटी, कोमटी पुंगाटी, डोगी आत्राम यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षणाच्या हक्कासाठी व आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाकपचा संघर्ष अखंड सुरू राहील….