*_शिक्षण व खेळाच्या माध्यमातून आपल्या समाजाचे व देशाचे नाव उज्वल करावे_* –
आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे
दिनांक : २७ जून २०२५
गडचिरोली :- शासकीय आश्रम शाळा गोडलवाही येथे “प्रवेश उत्सव” मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या शुभहस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यानंतर विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले व शालेय साहित्याचे वाटप आमदार नरोटे यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार नरोटे यांनी त्यांच्या मातृभाषा गोंडीमध्ये संवाद साधत त्यांच्याशी आत्मीयतेने हितगुज केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, “शिक्षण हेच यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधावा. शिक्षणाबरोबरच खेळामध्येही सक्रीय सहभाग आवश्यक आहे. खेळाच्या माध्यमातूनदेखील आपण आपल्या समाजाचे व देशाचे नाव उज्वल करू शकतो.”
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमानंतर आमदार डॉ. नरोटे यांनी शाळेतील निवास व्यवस्था, स्वयंपाकगृह व भोजन व्यवस्थेची पाहणी केली. अन्न व निवास व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी न येण्यासाठी प्रशासनाने तत्पर राहावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळेस प्रामुख्याने सरपंच वेणाजी तुलावी, धानोरा पंचायत समिती शिक्षणाधिकारी सौ. हेमलता परसा, केंद्रप्रमुख मेंडाटोला सौ. सोमणकर मॅडम, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पाचे विद्याधरजी चौधरी, गेडाम साहेब, डॉ. पूजा परशुरामकर, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, धानोरा तालुकाध्यक्ष श्री साजनजी गुंडावार, श्री. सारंग साळवे, श्री. सुभाष धाईत, श्री. सुभाष खोबरे, श्री. राकेश दास व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.






