*भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू!*
_गुरुपली गावाजवळ बोलेरो आणि दुचाकीची धडक — तरुण ठार_
*एटापल्ली,*
एटापल्ली तालुक्यातील गुरुपली गावाजवळ आज भीषण अपघात होऊन एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात गुरुपली येथील डांबर प्लांट समोर घडला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक रघु आत्राम (वय २२, रा. पंदेवाही, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) हा आपल्या MH33 AF 1967 या क्रमांकाच्या दुचाकीने आल्लापल्ली येथून एटापल्लीकडे जात होता. दरम्यान एटापल्लीवरून आल्लापल्लीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो पिकअप (MH33 P 2996) ने त्याला जोरदार धडक दिली.
ही भीषण धडक इतकी जोरदार होती की रघु आत्राम याचा जागीच मृत्यू झाला. बोलेरो पिकअप चालवत असलेला आरोपी कृपाल नागेश मुराशेटीवार (वय २५, रा. एटापल्ली) याच्या बेदरकारपणामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक रघु आत्राम याच्या अकाली मृत्यूमुळे पंदेवाही गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.