Home Breaking News जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदी घोटाळ्याप्रकरणी औषध निर्माण अधिकारी निलंबित

जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदी घोटाळ्याप्रकरणी औषध निर्माण अधिकारी निलंबित

76

जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदी घोटाळ्याप्रकरणी औषध निर्माण अधिकारी निलंबित

 

गडचिरोली, ता. १७ : जिल्हाभर गाजलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदी घोटाळ्याप्रकरणी औषध निर्माण अधिकारी महेश प्रभाकर देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूर येथील आरोग्य सेवा उपसंचालकांनी आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत हे निलंबनाचे आदेश दिले आहेत.

 

२०१९ पासून सुरू असलेल्या या औषध खरेदी घोटाळ्यात देशमुख यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांपर्यंत या तक्रारी पोहोचल्यानंतर, त्यांनी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली. या समितीच्या अहवालात आर्थिक अनियमितता झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्यावर तातडीने कारवाई करण्याची शिफारस उपसंचालक आरोग्य सेवा यांना करण्यात आली होती. त्यानुसार, मुंबई येथील आरोग्य सेवा सहसंचालक, अर्थ व भांडार, यांनीही तपासणी केली. या तपासणीतही आर्थिक अनियमितता आढळून आल्याने त्यांनी नियुक्ती प्राधिकारी असलेल्या उपसंचालकांना निलंबनाचे आदेश दिले. उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांनी देशमुख यांना निलंबित करून त्यांचे नवीन मुख्यालय रजेगाव, जि. गोंदिया येथे निश्चित केले आहे. या घोटाळ्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेतील भ्रष्टाचार चर्चेत आला असून या घोटाळ्यात सहभागी इतरांवरही कारवाई होते की नाही, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!