गडचिरोली जिल्ह्यातील १७ संवर्ग पेसा कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्तीच्या मागणीसाठी कामबंद आंदोलनाची चेतावणी
गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात कार्यरत असलेल्या १७ संवर्ग पेसा कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी नियुक्ती आदेश देण्यात यावा, अन्यथा १० सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
महसूल व वनविभागाने दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी काढलेले परिपत्रक आणि सामान्य प्रशासन विभागाचा ५ सप्टेंबर २०२५ चा शासन निर्णय अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या निर्णयानुसार एक दिवसाची सेवा खंडीत केल्यास मागील सेवा गृहीत धरली जाणार नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील १७ संवर्ग कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या ५ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती. मात्र त्यात सेवा खंडीत होण्याचा किंवा कर्मचाऱ्यांना शासन कर्मचारी मानले जाणार नाही असा कुठेही उल्लेख नसल्याचे पेसा कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे.
“आमच्यावर अन्यायकारक निर्णय लादण्यात येत असून, तो शासनाने तातडीने रद्द करावा. अन्यथा १० सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येईल,” असा इशारा आदिवासी १७ संवर्ग पेसा कर्मचारी संघटनेने दिला आहे.पत्रकार परिषदेत अध्यक्ष स्वप्नील मडावी,विशाखा मडावी,राज्य सल्लागार चेतन मडावी व शेकडो कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.






