*“कॉल बिफोर यू डिग (CBuD)” अॅपबाबत जागरूकता कार्यशाळा*
*भूमिगत संपत्तीचे नुकसान टाळण्यासाठी भारत सरकारचा दूरसंचार विभागाचा अभिनव उपक्रम*
गडचिरोली, दि. १० ऑक्टोबर (जिमाका):
भारत सरकारच्या दूरसंचार विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या “कॉल बिफोर यू डिग (CBuD)” या मोबाईल अॅप्लिकेशनबाबत जागरूकता कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे करण्यात आले. ही कार्यशाळा गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाली.
या अॅप्लिकेशनचा उद्देश उत्खनन कार्यादरम्यान भूमिगत उपयुक्तता मालमत्तांचे नुकसान टाळणे हा असून, उत्खनन एजन्सी किंवा ठेकेदारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाच्या मार्गावर असलेल्या विद्यमान सुविधा जसे की वीज, दूरसंचार, पाणीपुरवठा, गॅस पाइपलाइन इत्यादींबाबत मालक विभागांना पूर्वसूचना देण्यासाठी हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.
कार्यशाळेला सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), ऊर्जा विभाग, नगरपालिका प्रशासन, बीएसएनएल, एअरटेल, जिओ, महानेट तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. दूरसंचार विभागाचे सहाय्यक महानिदेशक श्री. योगेंद्र सिंग बघेल यांनी अॅप्लिकेशनच्या वापराचे सादरीकरण करून उपस्थितांना माहिती दिली.
“कॉल बिफोर यू डिग (CBuD)” हा भारत सरकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम असून, देशभरातील सर्व शासकीय आणि खासगी उत्खनन कामे एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा उद्देश या अॅपच्या माध्यमातून साधला जात आहे. या अॅपमुळे भूमिगत सुविधा जसे की फायबर ऑप्टिक, वीज केबल, पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन्स इत्यादींचे नुकसान टाळले जाऊन विभागांमध्ये समन्वय सुधारला जाणार आहे.
जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी सर्व संबंधित विभागांना या अॅप्लिकेशनचा वापर नियमित करण्याचे निर्देश दिले तसेच उत्खनन कामे सुरू करण्यापूर्वी “कॉल बिफोर यू डिग” या प्रणालीचा अनिवार्य अवलंब करण्याचे आवाहन केले.