*दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्याची सुवर्णसंधी;*

21

*दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्याची सुवर्णसंधी;*
* ४० हजारांहून अधिक बँक खात्यांमध्ये ७.७० कोटी रक्कम शिल्लक*
*आवश्यक कागदपत्रांसह बँकेत संपर्क साधावा – अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे*
गडचिरोली, (जिमाका) दि. १५ ऑक्टोबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या बँक खात्यांतील ठेवी “ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” या निधीकडे हस्तांतरित केल्या जातात. मात्र, अशा ठेवीदारांना आपली रक्कम परत मिळविण्याचा संपूर्ण अधिकार आहे. यासाठी संबंधितांनी आपल्या बँकेत आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे यांनी केले आहे.

*गडचिरोली जिल्ह्याचा आकडा*
गडचिरोली जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये एकूण ४०,४९१ खाती निष्क्रिय असून, त्यातील एकूण रक्कम ७ कोटी ७० लाख रुपये (₹७,७०,२९,७७०/-) इतकी आहे.
यात २७९ शासकीय खात्यात ₹९३.५० लाख, १२,१५६ संस्थात्मक खात्यात ₹३.२२ कोटी आणि
२८,०५६ वैयक्तिक/रिटेल खात्यात ₹३.५५ कोटी रकम शिल्लक आहे

*राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्थिती*
देशभरातील विविध बँकांमध्ये एकूण ₹१.३५ लाख कोटी इतक्या रकमेच्या ठेवी “DEAF” निधीत आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील ठेवी ₹५,८६६ कोटी असून, त्यात वैयक्तिक खाती ₹४,६१२ कोटी, संस्थात्मक ठेवी ₹१,०८२ कोटी आणि सरकारी योजनांतील ठेवी ₹१७२ कोटी आहेत.
*ठेवी परत मिळविण्याची प्रक्रिया*
ठेवीदारांनी आपल्या संबंधित बँक शाखेत संपर्क साधून खालील प्रक्रिया पूर्ण करावी:
1. अद्ययावत KYC कागदपत्रे (ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा इ.) सादर करणे.
2. संबंधित खात्याचा क्रमांक व माहिती द्यावी.
3. एक पत्री दावा अर्ज भरून स्वाक्षरी करावी.
या प्रक्रियेनंतर बँकेमार्फत ठेवीदारांना त्यांच्या मूळ खात्यात रक्कम परत मिळणार आहे.
ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता मोहिमेअंतर्गत १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व बँक शाखांमध्ये जनजागृती शिबिरे, कॅम्प आणि ग्राहक भेटी आयोजित करण्यात येत आहेत. तसेच २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दिवाळीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बँकांमार्फत विशेष स्टॉल उभारले जाणार आहेत.
“गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जनजागृती मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आपल्या निष्क्रिय खात्यातील रक्कम परत मिळवावी. ही सर्वांसाठी सुवर्णसंधी असून, बँका व जिल्हा प्रशासन नागरिकांना पूर्ण सहकार्य करेल,” असे आवाहन प्रशांत धोंगळे, अग्रणी जिल्हा प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, गडचिरोली यांनी केले आहे.