*लवकर निदान, निरोगी जीवन — कुष्ठरोग शोध मोहिमेत गडचिरोलीकरांनी द्यावे सहकार्य*

54

*लवकर निदान, निरोगी जीवन — कुष्ठरोग शोध मोहिमेत गडचिरोलीकरांनी द्यावे सहकार्य*

 

*जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

 

*कुष्ठरुग्ण शोध अभियान : १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५*

 

गडचिरोली, दि.16 : आरोग्य विभागामार्फत शून्य कुष्ठरोग प्रसार २०२७ हे महत्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी विशेष “कुष्ठरुग्ण शोध अभियान” १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठकीत या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यंत्रणेला निर्देश देण्यात आले.

 

१४ दिवस चालणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे जिल्ह्यातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण ओळखणे, त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे, तसेच संसर्गाची साखळी तोडून रोगाचा प्रसार थांबवणे हा आहे. हे अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागात तसेच शहरी भागातील जोखीमग्रस्त वस्त्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

 

*अभियानाची कार्यपद्धती*

 

या मोहिमेदरम्यान आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवकांच्या पथकांमार्फत घरोघर भेट देऊन सर्वेक्षण केले जाईल.

घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोगाबाबत शारीरिक तपासणी करण्यात येईल. त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टे, जाड झालेली त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवया विरळ होणे, हात-पायांमध्ये बधिरता अशी संशयास्पद लक्षणे आढळल्यास संबंधिताची संशयित रुग्ण म्हणून नोंद केली जाईल.

 

संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकारी ७ दिवसांत तपासणी करतील. निदान निश्चित झाल्यानंतर ताबडतोब मोफत उपलब्ध असलेले बहुविध औषधोपचार सुरू केले जातील.

 

*अधिकाऱ्यांचे आवाहन*

 

जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले, “कुष्ठरोग पूर्णपणे बरा होणारा आहे. पथके घरोघर तपासणीसाठी येतील, त्यांना संपूर्ण सहकार्य करावे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. लवकर निदान म्हणजे लवकर उपचार आणि निरोगी जीवन.”

 

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद श्री. सुहास गाडे यांनी सांगितले, “अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभाग, ग्रामविकास, महिला व बाल कल्याण आदी विविध विभागांचा समन्वय साधण्यात आला आहे. समाजानेही सक्रिय सहभाग देऊन जिल्ह्याला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी हातभार लावावा.”

 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी माहिती देताना सांगितले, “या १४ दिवसांत आरोग्य पथके प्रत्येक घराला भेट देऊन सर्व सदस्यांची तपासणी करतील. कृपया योग्य माहिती द्यावी आणि कुष्ठरोगाची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित कळवावे, जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील.”

 

कुष्ठरोग लवकर निदान झाल्यास पूर्णपणे बरा होतो. उपचार मोफत उपलब्ध आहेत, त्यामुळे कोणताही संकोच न बाळगता तपासणी करून घ्यावी असे आवाहन सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सचिन हेमके यांनी केले आहे.