*नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (टप्पा–2) अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न*
*हवामान बदल, जलसंधारण, संवर्धित शेती आणि बहुविध कृषी व्यवसायावर सविस्तर मार्गदर्शन*
गडचिरोली दि. 10 डिसेंबर :
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (टप्पा–2) अंतर्गत जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण कार्यशाळा आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी भूषविले. तर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून प्रकल्प राबविताना प्रशासनाचे धोरणात्मक पाठबळ कायम राहील, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आदी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*जिल्ह्याची भौगोलिक स्थिती व प्रकल्पाची सद्यस्थितीचे सादरीकरण*
कार्यशाळेच्या प्रारंभी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक, पर्जन्य, मातीचे प्रकार आणि कृषी संरचनेची माहिती देत प्रकल्पातील सद्यस्थितीचे सविस्तर सादरीकरण केले. प्रकल्पाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्ह्यातील प्रगती, आव्हाने आणि पुढील दिशा यावर त्यांनी भर दिला.
*प्रकल्प संचालकांकडून सखोल माहिती व दिशा*
प्रकल्प संचालक श्री. परिमल सिंह यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे व्यापक उद्दिष्ट, रचना आणि टप्प्यांची माहिती सविस्तरपणे दिली. हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम, गाव निवड समितीची जबाबदारी, ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजन प्रक्रिया, पाण्याचा ताळेबंद, मृद व जलसंधारण उपचार, जमिनीचे आरोग्य सुधारणा, हवामान–अनुकूल तंत्रज्ञान अशा महत्त्वाच्या घटकांवर त्यांनी भर दिला.
यासोबतच सेंद्रिय व जैविक खतनिर्मिती, विविध पिकपद्धती, बियाणे संवर्धन, शेती शाळांचे महत्त्व, मशागत प्रक्रियेतील बदल, बांबू–वृक्ष लागवड, फळबाग विस्तार, जोडधंदे, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग, पंपसंच–पाईप साहित्य, वैयक्तिक शेततळे आदी योजनांची अंमलबजावणी कशी वेगवान करता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
*शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी प्रभावी प्रसाराची सूचना*
श्री. सिंह यांनी शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट, तरुण उद्योजक यांना प्रकल्पातील विविध योजनांची माहिती प्रसारमाध्यमे, कार्यशाळा आणि गावसभांद्वारे प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली. महाडीबीटीच्या कार्यप्रणालीविषयी अधिक स्पष्टता देऊन अर्ज–प्रस्तावांची तात्काळ व वेळेत पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
*अधिकार्यांना तात्काळ प्रस्ताव निराकरणाचे आदेश*
प्रकल्प राबविताना कोणत्याही स्तरावर विलंब राहू नये म्हणून विभागीय व तालुका स्तरावरील अधिकारी–कर्मचारी यांना प्राप्त प्रस्तावांचे जलदगतीने निराकरण करण्याचे आदेश कार्यशाळेत देण्यात आले. शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देणे, हवामान–सजग शेती विस्तार आणि कृषी–आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे हे प्रकल्पाचे प्रमुख ध्येय असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.
कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
००००




