*ढेकणी परसबागेतील भाजीपाला मध्यान्ह भोजनात तर उरलेला विक्रीत*
माझी शाळा – माझा उपक्रम, माझी शाळा – माझा अभिमान या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढेकणी येथे मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन मट्टामी, उपाध्यक्ष सुखदेव कुमोटी, अंगणवाडी सेविका सुमित्रा कुमोटी यांच्या मार्गदर्शनात परसबाग तयार करण्यात आलेली असून या परसबागेतील भाज्यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात नियमितपणे करण्यात येत आहे. तसेच उर्वरित भाज्यांची विक्री करून शाळेच्या उपक्रमांसाठी निधी निर्माण केला जात आहे.
शाळेच्या परिसरातील मोकळ्या जागेत विकसित केलेल्या या परसबागेत पालक, मेथी, कोथिंबीर, भेंडी, टोमॅटो, वांगी, दोडका, भोपळा, कारली, मिरची, कोबी, शेवगा, कांदा, लसूण, मुळा, गाजर, बटाटा, नवलगोल, चवळीशेंग, वालशेंग, पपई आदी विविध भाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताजी व पोषक भाजी मिळत असून आरोग्यदायी आहाराची सवयही लागते आहे.
विद्यार्थ्यांच्या सहभागातून बियाणे पेरणे, पाणी देणे, तण काढणे व सेंद्रिय खतांचा वापर या सर्व कामांत हातभार लावला जातो. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार, जबाबदारीची भावना आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होत आहे.
परसबागेतून मिळालेल्या भाजीपाल्यांचा वापर मध्यान्ह भोजनात करून उर्वरित भाज्या स्थानिक स्तरावर विक्रीस ठेवण्यात येतात. या विक्रीतून मिळालेला निधी शाळेतील विविध शैक्षणिक व संस्कारात्मक उपक्रमांसाठी उपयोगात आणला जातो.
या उपक्रमामुळे शाळेची परसबाग केवळ सौंदर्यवर्धनासाठी नसून आरोग्य, स्वावलंबन व आर्थिक शिस्त यांचे उत्तम उदाहरण ठरत आहे. “माझी शाळा – माझा अभिमान” ही संकल्पना या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरली आहे.






