मुंबईतील प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश नियोजन बैठक उत्साहात संपन्न; गडचिरोलीतील भाजपाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026
मुंबई येथे “पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026” अंतर्गत महाराष्ट्र प्रदेशाची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहपूर्ण आणि संघटनात्मक ऊर्जेच्या वातावरणात पार पडली.
या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे चे राष्ट्रीय सह-संघटन महामंत्री शिवप्रकाश मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनातून महाअभियानाच्या अंमलबजावणीसाठी सुस्पष्ट दिशा निश्चित करण्यात आली.
बैठकीत आगामी प्रशिक्षण उपक्रमांचे सविस्तर नियोजन, कार्यकर्त्यांची वैचारिक व संघटनात्मक बळकटी, बूथस्तरावरील प्रभावी रचना आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर यावर सखोल चर्चा झाली. “एकात्म मानववाद” या विचारसरणीला अधिष्ठान मानून कार्यकर्त्यांना सक्षम, प्रशिक्षित आणि समाजाभिमुख नेतृत्व म्हणून घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातून भाजपा जिल्हाध्यक्ष मा. रमेशजी बरसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह-संयोजक अनिल पोहनकर, सह संयोजक अनिल तिडके, सोशल मीडिया प्रमुख सुरज गुंडमवार, महिला मोर्चाच्या सीमा ताई कन्नमवार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. जिल्ह्यात महाअभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
प्रदेशभरातील पदाधिकाऱ्यांनी 2026 चे प्रशिक्षण महाअभियान व्यापक आणि परिणामकारक करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक कार्यकर्ता हा संघटनेचा कणा असून, त्याच्या वैचारिक व संघटनात्मक सक्षमीकरणातूनच सबळ राष्ट्रनिर्मिती शक्य आहे, हा संदेश या बैठकीतून देण्यात आला.
गडचिरोली भाजपाचे पदाधिकारी नव्या उर्जेसह आणि दृढ संकल्पाने जिल्ह्यात या महाअभियानाची अंमलबजावणी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“सशक्त संघटन – सक्षम कार्यकर्ता – सबळ राष्ट्रनिर्मिती”
या ध्येयवाक्यासह महाअभियानाची प्रभावी आणि दूरगामी सुरुवात झाली आहे






