गडचिरोलीत युवकाचा संशयास्पद मृत्यू
शिवाजी महाविद्यालयाशेजारील पटांगणात मृतदेह आढळला; हत्येचा संशय, शहरात खळबळ
गडचिरोली : शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाशेजारी असलेल्या खुल्या पटांगणात रविवारी (दि. ३) सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास २४ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना हा मृतदेह दिसल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
मृत युवकाची ओळख हरबचन खन्ना पटवा (वय २४), रा. गोकुळनगर, गडचिरोली अशी पटली आहे. शनिवारी उशिरा रात्री ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हरबचन हा दारू विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पटवा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, हरबचनची अन्यत्र हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या पटांगणात आणून टाकण्यात आला असावा, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह हलविण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू असून, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.








