रेखाभटाळ गावातील पाणी समस्या गंभीर; भाकपाची हातपंप दुरुस्तीची मागणी
एटापल्ली : तालुक्यातील ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत रेखाभटाळ गावात श्री. झुरु काऱ्या गावडे यांच्या घरासमोर असलेला अत्यंत वापरातील हातपंप अनेक महिन्यांपासून बंद असल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
हा हातपंप परिसरातील प्रमुख व सर्वाधिक वापरात असलेला असल्यामुळे अनेक कुटुंबांचा पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे अवलंब होता. मात्र तो बंद पडल्यापासून गावातील महिलांना, वृद्धांना व लहान मुलांना दररोज दूर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी उपलब्ध असलेले पाणी अपुरे व अस्वच्छ असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाला आहे.
सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विहिरी व इतर पाण्याचे स्रोत आटत चालले असून पाण्यासाठी रांगा लागणे, वेळेचा अपव्यय होणे आणि वादविवाद होण्याच्या घटना वाढत आहेत. घरगुती वापरासह जनावरांच्या पाण्याचीही अडचण निर्माण झाली असून गावातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सदर हातपंपाची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाकपा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, भाकपा गडचिरोली), कॉ. सुरज जककुलवार (जिल्हा सदस्य) तसेच भाकपा सदस्य व ग्रामपंचायत सदस्य कॉ. सततु हेडो, भाकपा सदस्य व ग्रामपंचायत सदस्य कॉ. रमेश कवडो व भाकपा सदस्य व ग्रामपंचायत सदस्य बाजू तुमरेटी यांनी ही मागणी केली आहे.






