Home Breaking News अंशकालीन स्त्री परिचारांच्या मानधनात वाढ; दरमहा ६ हजारांपर्यंत पोहोचले मानधन

अंशकालीन स्त्री परिचारांच्या मानधनात वाढ; दरमहा ६ हजारांपर्यंत पोहोचले मानधन

73

अंशकालीन स्त्री परिचारांच्या मानधनात वाढ; दरमहा ६ हजारांपर्यंत पोहोचले मानधन

 

३ हजार रुपयांची वाढ जाहीर; किमान वेतन १६,८०० लागू करण्यासाठी सिटूचा लढा कायम

 

मुंबई | प्रतिनिधी :

राज्यातील अंशकालीन स्त्री परिचारांसाठी दिलासादायक निर्णय घेत शासनाने त्यांच्या मानधनात ३ हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. १७ मार्च २०२६ रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आता या कर्मचाऱ्यांना दरमहा ६ हजार रुपये मानधन मिळणार आहे.

राज्यातील सुमारे १० हजार स्त्री परिचारांनी मानधन वाढ आणि किमान वेतनासाठी दीर्घकाळ संघर्ष केला होता. भर पावसाळ्यात संपासह विविध आंदोलनांद्वारे त्यांनी आपला आवाज बुलंद केला होता. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी मानधनवाढीचे आश्वासन दिले होते.

तसेच अंगणवाडी, आशा व शालेय पोषण कर्मचाऱ्यांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सिटूच्या नेतृत्वात राजूर (ता. अकोले) ते लोणी असा लाँग मार्च काढण्यात आला होता. या आंदोलनानंतरही शासनावर दबाव वाढला होता.

दरम्यान, शासनाच्या निर्णयामुळे स्त्री परिचारांना काही प्रमाणात न्याय मिळाला असला, तरी त्यांना कायम सेवेत सामावून घेणे आणि किमान वेतन दरानुसार १६,८०० रुपये वेतन देणे ही मागणी अद्याप प्रलंबित आहे.

भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सिटू)ने शासनाकडे ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस एम. एच. शेख आणि माकपा जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी सांगितले की, स्त्री परिचार कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार असून त्यांना पूर्ण हक्क मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे.

मानधनवाढीचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी किमान वेतन आणि कायम सेवेसाठीचा लढा अजूनही सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Don`t copy text!