“गडचिरोलीत १०८ हनुमान चालीसा पठणातून समस्यांवर तोडगा; काँग्रेसचा २४ मार्चला भव्य उपक्रम”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातच नागरिकांना संकटांचा सामना; मोठ्या प्रमाणात उपस्थितीचे आवाहन
गडचिरोली, दि. 23 :
जिल्ह्यातील विविध प्रलंबित व गंभीर समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, तसेच नागरिकांना सुलतानी संकटातून मुक्तता मिळावी या उद्देशाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता सेेमाना देवस्थान येथे भव्य १०८ हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी या कार्यक्रमासाठी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाही जिल्ह्यातील अनेक मूलभूत समस्या अद्याप कायम असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या मते, जिल्ह्यात अपघातांचे वाढते प्रमाण, शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण, रानटी हत्ती व वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान, तसेच रस्ते व आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था यांसारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. याशिवाय, दवाखान्यांमध्ये डॉक्टर व स्टाफची कमतरता, बेरोजगारीची वाढती समस्या, लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि वनपट्ट्यांचे प्रलंबित दावे यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील शाळा, दवाखाने आणि शासकीय कार्यालयांमधील रिक्त पदे तातडीने भरणे, स्थानिक युवकांना प्रकल्पांमध्ये ८० टक्के रोजगार देणे, अतिरिक्त बस सेवा सुरू करणे आणि रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणे या प्रमुख मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आयोजित १०८ हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील समस्या दूर व्हाव्यात आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, असा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक आणि विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
🔻 खास मुद्दे (बॉक्स न्यूज) :
२४ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता कार्यक्रम
सेेमाना देवस्थान येथे आयोजन
१०८ हनुमान चालीसा पठणातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
काँग्रेसकडून विविध ११ प्रमुख मागण्या मांडल्या





