Home गडचिरोली चंद्रपूरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अधिवेशन; शिक्षकांच्या प्रश्नांवर होणार मंथन

चंद्रपूरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अधिवेशन; शिक्षकांच्या प्रश्नांवर होणार मंथन

128

 

चंद्रपूरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अधिवेशन; शिक्षकांच्या प्रश्नांवर होणार मंथन

जुनी पेन्शन, TET, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नागपूर विभागाचे दोन दिवसीय अधिवेशन शनिवार (दि. २८ मार्च) व रविवार (दि. २९ मार्च २०२६) रोजी चंद्रपूर येथील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज, बाबूपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

पूर्वी विदर्भ माध्यमिक शिक्षक परिषद म्हणून ओळखली जाणारी ही संघटना आता राज्यव्यापी स्वरूपात कार्यरत असून शिक्षकहित, शिक्षणहित व राष्ट्रहित हे तिचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा व विचारमंथन होणार आहे.

अधिवेशनात जुनी पेन्शन योजना, शिक्षक पात्रता परीक्षा (TET), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, तक्रार निवारण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय शिक्षकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांना भेट देऊन शिक्षकांना निमंत्रण देण्यात आले. शिक्षकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे व त्यावर ठोस मार्ग निघावा, या उद्देशाने अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने यापूर्वीही शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी शासनाकडे निवेदने देऊन आंदोलने केली आहेत. माजी शिक्षक आमदार मा. नागो गाणार यांनीही सभागृहात अनेकदा शिक्षकांचे प्रश्न मांडले असून काही मुद्द्यांवर यशही मिळाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतन, विमा संरक्षण व निवृत्तीवेतनाच्या अनेक प्रकरणांना गती मिळवून देण्यात संघटनेला यश आले आहे. मात्र अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी अधिवेशनात महत्त्वाचे ठराव मंजूर होणार आहेत. हे ठराव शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत.

अधिवेशनात शासन, प्रशासन, शिक्षक व जनप्रतिनिधी सहभागी होणार असून, हे अधिवेशन शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर विभागातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभाग कोषाध्यक्ष संतोष द. सुरावार यांनी केले आहे.

Don`t copy text!