“३५ वर्षांची निष्ठावंत सेवा पूर्ण; विश्वनाथ दूधबळे यांना भावपूर्ण निरोप”
गडचिरोली, प्रतिनिधी :-
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय, जिल्हा परिषद गडचिरोली येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. विश्वनाथभाऊ विठ्ठलराव दूधबळे यांनी आपल्या सेवेला दिलेल्या प्रदीर्घ व प्रामाणिक योगदानाचा सुवर्णअध्याय पूर्ण करत दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या शासकीय सेवेला सुरुवात ज्या कार्यालयातून केली, त्याच कार्यालयातून त्यांनी सेवेला निरोप दिला.
यांच्या सन्मानार्थ गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर सेवक संघटनेच्या वतीने भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांनी भूषविले. यावेळी अधीक्षक (वेतन पथक) विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी अमरसिंह गेडाम, संघटनेचे अध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारंभात उपस्थित मान्यवरांनी श्री. दूधबळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी वृत्ती, शिस्तप्रियता आणि प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक केले. सहकाऱ्यांशी त्यांनी जपलेले स्नेहपूर्ण संबंध आणि कार्यालयीन कामातील अचूकता यामुळे ते सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करू शकले, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यालयातील कर्मचारीवृंद तसेच शिक्षकेत्तर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्री. दूधबळे यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्यपूर्ण, आनंदी आणि यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
समारंभास हेमंत रामटेके, भूपेश वैरागडे, अभिषेक शिवणकर, राजू मुंगेलवार, राकेश हेडाऊ लाडवे, अरुण धोडरे आदी मान्यवर उपस्थित होते.






