Home गडचिरोली अहेरी प्रभाग ४ मध्ये अपूर्ण रस्ता; भाकपाने दिला आंदोलनाचा इशारा

अहेरी प्रभाग ४ मध्ये अपूर्ण रस्ता; भाकपाने दिला आंदोलनाचा इशारा

7

अहेरी प्रभाग ४ मध्ये अपूर्ण रस्ता; भाकपाने दिला आंदोलनाचा इशारा

 

अहेरी नगर पंचायत अंतर्गत प्रभाग क्र. ०४ मधील ज्ञानेश्वर निमसरकार ते कमल आत्राम यांच्या घरापर्यंत सुरू असलेले सी.सी. रोडचे काम काही महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर रस्त्यावर फक्त माती टाकून काम अर्धवट सोडण्यात आले असून अवकाळी पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

प्रभागातील नागरिकांनी आपली समस्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे मांडली असून, अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांना, विशेषतः वृद्ध व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच त्यांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना दैनंदिन हालचालींमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून नाल्याचे कामही अपूर्ण असल्याने पाणी साचत आहे.

 

या प्रकरणी कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, गडचिरोली) यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी, नगर पंचायत अहेरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुरज जक्कुलवार (जिल्हा कार्यकारिणी सदस्य) यांच्या सोबत उषा गावडे, ललिता कोकर्डे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

 

यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार यांनी आपल्या निवेदनात व वक्तव्यात सांगितले की, “प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी सतत संघर्ष करावा लागत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. काही महिन्यांपासून रस्त्याचे काम अपूर्ण ठेवणे हे प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष आहे. पावसाळ्यापूर्वी तात्काळ रस्ता पूर्ण करावा. तसेच संबंधित कामाचे इंजिनिअर व ठेकेदार यांना अपूर्ण कामाबाबत कारणे दाखवा नोटीस देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

 

दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असून या कालावधीत रस्ता पूर्ण न झाल्यास नागरिकांचे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्वरित काम पूर्ण न झाल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष व स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Don`t copy text!