देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात खासदारांशी भेटी
सदर, पाचपावली कोविड सेंटरला भेट
आज नागपुरात वर्धा आणि गडचिरोलीच्या खासदारांच्या भेटी घेत त्यांच्याकडून त्या जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
नागपूर, 23 एप्रिल
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वर्धा आणि गडचिरोलीच्या खासदारांच्या भेटी घेत त्यांच्याकडून त्या जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची त्यांनी भेट घेतली. वर्ध्यात जेथे ऑक्सिजन पुरवठ्याचा स्त्रोत आहे, अशा ठिकाणी एक जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार आहे. याशिवाय, रामदास तडस आणि भाजपाच्या वतीने आणखी एक कोविड सेंटर वर्ध्यात निर्माण केले जाणार आहे. त्यासंदर्भात विस्तृत माहिती रामदास तडस यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनीही आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना गडचिरोलीतील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिवीर याचा थोडा तुटवडा जाणवतो आहे, असे त्यांनी सांगितले. आपण हा विषयात सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सदर येथील आयुष कोविड सेंटर आणि पाचपावली येथील नागपूर महापालिका, मेडिकल सर्व्हिस सोसायटी आणि जमात-ए-इस्लामीतर्फे चालविल्या जाणार्या कोविड सेंटरला सुद्धा आज देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, अविनाश ठाकरे, प्रकाश भोयर, सुनील हिरणवार, सुनील अग्रवाल आणि इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे डॉ. अनुप मरार आणि डॉ. विंकी रूघवानी यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना विदर्भातील रूग्णालयांना तोंड द्याव्या लागत असलेल्या अडचणींची माहिती दिली आणि सहकार्य मागितले. हे सर्व विषय योग्य प्राधीकरणाकडे मांडण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.