Home Breaking News उडेरा दलित वस्तीत रस्ता-नालीसाठी भाकपाची मागणी

उडेरा दलित वस्तीत रस्ता-नालीसाठी भाकपाची मागणी

16

उडेरा दलित वस्तीत रस्ता-नालीसाठी भाकपाची मागणी

पावसाळ्यात घरात पाणी शिरते; प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज

एटापल्ली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामपंचायत उडेरा येथील दलित वस्तीमध्ये मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे समोर आले आहे. बापू कंबलवार यांच्या घरापासून शंकर नक्कलवार यांच्या घरापर्यंतचा परिसर आजही पक्का रस्ता व नालीविना असल्याने नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

हा वस्तीभाग उतारावर असल्यामुळे गावातील पावसाचे पाणी थेट या भागात साचते आणि अनेक वेळा घरातही शिरते. परिणामी चिखल, साचलेले पाणी व डासांच्या प्रादुर्भावामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून विविध आजारांचा धोका वाढला आहे. पिण्याच्या पाण्याचेही प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

सदर गाव खान प्रभावित क्षेत्रात येत असल्याने जिल्हा खनिकर्म निधी (DMF) अंतर्गत या भागातील रस्ता व नालीची कामे तातडीने मंजूर करावीत, अशी मागणी होत आहे.

या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार व जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन तात्काळ पक्का रस्ता व नाली बांधकामास मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “उडेरा येथील दलित वंचित नागरिकांची समस्या ही केवळ सुविधा नसून त्यांच्या जगण्याच्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. पावसाळ्यात घरात पाणी शिरणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा भाकपा नागरिकांसह तीव्र आंदोलन उभारेल.”

दरम्यान, भाकपाच्या वतीने स्थानिक नागरिकांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, प्रशासनाने लवकरात लवकर काम मंजूर करून या वस्तीतील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Don`t copy text!